esakal | नगर- सोलापूर महामार्गाबाबत भाजप आक्रमक; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Demand to blacklist the contractor working on Nagar Solapur Highway

नगर- सोलापूर महामार्गावरील मिरजगाव येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करावी, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रसिद्धिप्रमुख सचिन पोटरे यांनी केली आहे.

नगर- सोलापूर महामार्गाबाबत भाजप आक्रमक; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी 

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : नगर- सोलापूर महामार्गावरील मिरजगाव येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करावी, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रसिद्धिप्रमुख सचिन पोटरे यांनी केली आहे. 

याबाबत पोटरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नगर- सोलापूर महामार्गावर सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तालुक्‍यातील मिरजगाव शहरात तर महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. तेथे 1200 मीटर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. यासाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात आले. हे काम झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसांत रस्त्याची दुर्दशा झाली. ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, लहान-मोठे अपघातही होऊन काहींचा बळीही गेला. पावसाळ्यात खड्डे तर उन्हाळ्यात धूळ या प्रकाराने मिरजगावकर वैतागले आहेत.

रस्त्याचे काम सुरू असतानाच ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. यावर कामाचा नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. आमदार पवार यांनी मतदारसंघात कामे दर्जेदार करा. जो ठेकेदार दर्जेदार काम करणार नाही त्याची खैर नाही, त्याला काळ्या यादीत टाकू, असा इशारा दिला होता. त्यानुसार ठेकेदारावर कारवाई करावी, या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पोटरे यांनी केली. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या. 

नगर- सोलापूर महामार्गावरील मिरजगाव येथील काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप बिल अदा केलेले नाही. पावसाळ्यानंतर या कामाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 
- रामराव म्हेत्रे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर 

संपादन : अशोक मुरुमकर