बिबट्याच्या दहशतीमुळे नगरमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी

अमित आवारी
Tuesday, 1 December 2020

शहराजवळील गावांपर्यंत बिबट्याचा वावर वाढला आहे.

अहमदनगर : शहराजवळील गावांपर्यंत बिबट्याचा वावर वाढला आहे. जनावरे, लहान मुले, नागरिकांना बिबट्याने लक्ष्य केल्याने शहर परिसरात भितीचे वातावरण आहे. 

शहरापासून जवळ असलेल्या चांदबिबी महालावर काही दिवसांपूर्वी नागरिकांना तीन ते चार बिबटे आढळून आले. त्याचे व्हिडिओ चित्रणही सोशल मीडियावर व्हायरल झाले. खरेतर शहरवासियांसाठी ही चिंताजनक बाब आहे. भक्ष्याच्या शोधात शहरातही हे बिबटे येऊ शकतात. शहराजवळ विस्तारणारी उपनगरे अतिशय विरळ लोकवस्तीचे आहेत.

भल्या पहाटे अंधार असताना शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होतो. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पाणी भरायला बाहेर असतो. काही दिवसांतील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना पाहता, महापालिकेने सध्या तरी भल्या पहाटेची पाणीपुरवठा करण्याची वेळ बदलावी, अशी मागणी माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली आहे. 

काहींना ही सूचना अतिशयोक्ती वाटत असली, तरी हे वास्तव नाकारता येणार नाही. शहरात मोठ्या वृक्षांची वानवा असली, तरी उपनगरात मोठ्या झुडुपे आहेत. लपून बसायला बिबट्याला हे पुरेसे असल्याचे येलुलकर यांनी म्हटले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for change of water supply due to leopard terror