ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीचा जुगाड ठरतोय जीवघेणा

गौरव साळुंके
Monday, 9 November 2020

अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात.

श्रीरामपूर ः तालुक्‍यात विविध रस्त्यांवरून सध्या बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक सुरू आहे. मात्र, अनेक बैलगाडीचालक अवैध बैलगाडी जुगाडाचा वापर करीत असल्याने, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे अशा बैलगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे.

"छावा'चे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्‍पाक खान यांना याबाबत विविध मागण्यांचे निवेदनात दिले आहे. 

श्रीरामपूर भागात अनेक ठिकाणी वापर होत असलेल्या अवैध बैलगाडी जुगाडामुळे, ट्रॅक्‍टरचालकही बैलगाडी जुगाडाद्वारे उसाची वाहतूक सर्रास करतात. जुगाड वाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण मिळते.

अशा वाहतुकीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी "छावा'ने केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा "छावा'चे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, शहराध्यक्ष शरद बोंबले, कार्याध्यक्ष गोरख शेजूळ, उपाध्यक्ष मनोज होंड, प्रवीण देवकर यांनी दिला आहे. 

माळवाडगावमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण 
तालुक्‍यातील माळवाडगाव येथील भवानीमाता मंदिरात दर वर्षीप्रमाणे स्वामी समर्थ मंडळाच्या सेवेकऱ्यांच्या पुढाकारातून दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने झाला.

या वेळी वसंत पिंपळे, डॉ. बाबासाहेब शिंदे, योगेश लटमाळे, सुभाष थोरात, महेश रत्नपारखी, अशोक आसने, बाळासाहेब आसने, राणी ढवळे, अलका आसने, स्वाती काळे उपस्थित होत्या. 

स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी एकजूट होऊन मूल्यसंस्कारांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन या वेळी श्री स्वामी सेवा केंद्राचे मूल्य सेवेकरी दीपक नाईक यांनी केले ते म्हणाले, ""आजच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत. यातून पुढील पिढी सावरेल. मनाचे श्‍लोक, रामायण-महाभारतातील प्रसंगांद्वारे मुलांचा विकास साधता येईल. सेवा मार्गाची वाटचाल अखंड असून, सेवामार्ग सर्वसामान्य जीवासाठी खुला आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for closure of bullock cart transport ahmednagr news