ओला दुष्काळ जाहीर करुन पिकांचे पंचनामे करा

सचिन सातपुते
Tuesday, 29 September 2020

ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करताना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना संयुक्त एकत्रित ठेऊन पंचनामे करावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे यांनी तहसीलदार अर्चना भाकड यांना दिले. 

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करताना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना संयुक्त एकत्रित ठेऊन पंचनामे करावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे यांनी तहसीलदार अर्चना भाकड यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यात यावर्षी जूनपासून 30 वर्षात कधी न झाला एवढा पाऊस झाला. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये कपाशी, बाजरी, भुईमुग, तूर व फळबाग आदी मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी व लागवड केली होती. पाऊस असल्याने पिके चांगली आली. परंतु या महिन्यात तालुक्यात सर्वत्र होत असलेल्या अतिवृष्टीने सर्व पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. 

शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. जी कपाशी आली त्यावर देखील बोंडअळी पडली आहे. काही भागात मशागत खर्चही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शासनाने कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करतांना गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी संयुक्त येऊन पंचनामे करावे. संयुक्त पंचनामे केल्यास शेतकऱ्यांचे फळबागेचे देखील पंचनामे होतील. त्यासाठी फळबागांचा स्वतंत्र पंचनामा करण्याची गरज पडणार नाही व फळबाग शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम लवकर मिळेल.

अगोदरच कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकरी आर्थिक संकटात भरडला गेला आहे. त्यामुळे त्वरित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यावेळी शिवाजी कणसे, प्रहारचे संदिप बामदळे, राजेंद्र खेडकर, संजय शिंदे, भागचंद्र काळे, नवनाथ गाढे, भिमराज गाढे आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for declaration of drought in Shevgaon taluka