पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करा

मनोज जोशी
Monday, 19 October 2020

अतिवृष्टीने शेतकरी हैरान झाला आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे राहिले.

कोपरगाव (अहमदनगर) : यावर्षी अतिवृष्टीने शेतकरी हैरान झाला आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे राहिले असल्याने सरकारने आता पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

परजणे यांनी म्हटले की, गेल्यावर्षीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना गारपीटीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुष्काळ, अनेक ठिकाणी आलेले महापूर, त्यानंतर पुन्हा अवकाळी, त्यातच रोगराई अशा एक ना अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून सावरत असताना आणि यावर्षी चांगल्या पीक पाण्याची अपेक्षा असताना सततच्या पावसाने सोयाबीन, कापूस, बाजरी, उडीद, मूग, तूर, कांदा, बटाटा, भात, ऊस या पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी स्वतः ला सावरुन घेताना संकटातून वाचलेल्या पिकांची जपणूक केली होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने उरली सुरली पिके नष्ट करुन टाकली आहेत. 

शेती व पिके अक्षरशः पाण्याखाली बुडाली. धान्य भाजीपाला भिजून गेला. काही ठिकाणी तर उभ्या पिकांसह शेती देखील वाहून गेली आहे.थोड्याफार प्रमाणात वाचलेली पिके आणि फळबागांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कोरोना महामारीमुळे कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील जनतेला या नैसर्गीक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ वाया घालण्याऐवजी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन पातळीवरुन तातडीने उपाय योजना राबविण्याबाबत संबंधित विभागांना आपण आदेश द्यावेत असे ही शेवटी परजणे यांनी म्हंटले आहे.निवेदनाच्या प्रती उप मुख्यमंत्री. अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for declaration of wet drought due to heavy rains