
नकाशे आणि तत्सम दस्तावेज व्यवस्थित स्कॅनिंग करुन ठेवण्याची मागणी नगरेसविका हेमा गुलाटी यांनी पालिकेकडे केली.
श्रीरामपूर (अहमदनगर) : नगरपालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगी विषयक प्रकरणे, बिगरशेती प्रकरणे, नकाशे आणि तत्सम दस्तावेज व्यवस्थित स्कॅनिंग करुन ठेवण्याची मागणी नगरेसविका हेमा गुलाटी यांनी पालिकेकडे केली.
या संदर्भात गुलाटी यांनी नगराध्यक्ष अनुराधा अदिक आणि प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना वरील मागणीचे निवेदन दिले. नगरपालिकेच्या बांधकाम विभागांतर्गत नगररचना विभाग हा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा विभाग असून सदर विभागामध्ये नगररचना विभागाकडील विविध योजनांचे नकाशे, विकास योजनांचे नकाशे, बांधकाम परवानगी विषयक परवानगी प्रकरणे, बिगरशेती प्रकरणे, विनापरवाना बांधकामे आणि तत्सम स्वरुपाचे दस्तावेज अनेक वर्षापासून उपलब्ध आहे.
त्यामुळे सदरचे दस्तावेज हे अद्यावत स्वरुपात ठेवणे आवश्यक आहे. परंतु, सध्या बांधकाम विभागाकडील बांधकाम परवानगी प्रकरणे, बिगरशेती विषयक प्रकरणे आणि त्या अनुषंगीक दस्तावेज हे पुरेशा जागे अभावी व्यवस्थितपणे ठेवलेले नाही. जुनी बांधकाम परवानगी प्रकरणासह नकाशे जीर्ण झाले असून त्याचे तुकडे पडत आहेत.
हा दस्तावेज विस्कळीत झाल्याने नागरिकांना सदरचे दस्तावेज शोधण्यासाठी आवश्यक माहितीसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे बांधकाम विभागाकडील मालमत्ता विषयक दस्तावेज हे महत्वाचे दस्तावेज असून ते स्कॅनिंग करुन डिजीटल फाईलमध्ये कायमस्वरुपासाठी जतन करावे. त्यासाठी स्कॅनर, प्रिंटर उपलब्ध करुन देण्याची मागणी गुलाटी यांनी निवेदनाद्वारे केली.
संपादन : अशोक मुरुमकर