निळवंडे उजळले; भंडारदरा धरण विद्युत रोषणाईने कधी उजळणार

शांताराम काळे
Thursday, 20 August 2020

भंडारदरा जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या भंडारदरा जलशयाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ता, लाईट, सीसीटिव्ही यांची येथे दुरवस्था झाली आहे.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या भंडारदरा जलशयाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ता, लाईट, सीसीटिव्ही यांची येथे दुरवस्था झाली आहे.

निळवंडे जलाशयावर नियमीत स्ट्रीट लाईट असतेच मात्र कार्यकारी अभियंता यांनी १५ ऑगस्टनिमीत्त देशप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून लाईट बसवून तिरंगा रंगात हे जलाशय उजळून टाकला होते. त्यामुळे जलाशय विविध रंगात आकर्षक दिसून आल्याने अनेकांनी त्याच्या या कल्पकतेला दाद दिली आहे. मात्र शंभरी गाठलेल्या भंडारदरा जलाशयावर असा प्रयोग का राबविला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

भंडारदरा जलशयावरील विजेचे दिवे कधी सुरु तर कधी बंद असतात. त्यानीही निळवंडेची री ओढली तर या दोन्ही जलाशय आकर्षणाचा विषय निश्चित ठरतील असे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आहे. मात्र भंडारदरा विभागासमोर अनुदान फंड नसल्याचा फंडा समोर असल्याने या जलशयारील गवत देखील काढणे अशक्य झाले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी आपल्या मानसिकतेतून बाहेर पडल्यास निळवंडे प्रमाणेच शंभरी गाठलेले हे जलाशय चकचकीतपणा येण्यास विलंब लागणार नाही.
किमान जलशयावरील लाईट लावली तरी सध्या काम भागेल. मात्र असे होताना दिसत नाही.

निळवंडे लाईट लागली असली तरी धरणावर जाणारा रस्ता खराब आहे. लाईट लावली म्हणजे सर्व काही झाले असेही समजून चालणार नाही, मात्र काही नाही तर बरे म्हणण्याची वेळ निळवंडे प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी केले आहे. अजून बरेच काम होणे आवश्यक आहे. मात्र कोरोना असताना व सामाजिक अंतर राखण्याचे आदेश असताना या सप्तरंगी लाईटने तरुणाई आकर्षित होत आहे. 

सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी सायंकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत येथे गर्दी दिसू लागली आहे. मोठ्या संख्येने तरुण या जलाशयाजवळ थांबून असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for electric lighting on Bhandardara dam like Nilwande