हजेरी तपासता मग आरोग्याचीही तपासणी करा; कर्मचारी संतापले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयात कर्मचारी वेळेत यावेत, यासाठी हजेरी नोंदवही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयात कर्मचारी वेळेत यावेत, यासाठी हजेरी नोंदवही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तशीच मोहीम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी हाती घ्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. शिक्षण विभागात एक दिवसात दोन व काल एक असे दोन दिवसात तीन कर्मचारी कोरोनाबाधित निघूनही प्रशासनाकडून दोन दिवस कामकाज बंद ठेवले जात नसल्याने, नाराजी व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यरत तीन कर्मचाऱ्यांच्या स्वॅबचाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वीही दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. त्यांतील एकाने कोरोनावर मात केली असून, दुसऱ्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यातच नव्याने तीन जणांची भर पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे प्रशासनाने किमान पाच दिवस विभागाचे कामकाज बंद ठेवून, सर्व परिसर सॅनिटाइझ करून घ्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

याबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथाही मांडली. मात्र, त्यावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. पंधरा दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागाकडून, कर्मचारी वेळेत येतात की नाही याची तपासणी केली जात असून, उशिरा येणाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात येत आहेत. कार्यालयीन कामकाज सुरळीत सुरू राहावे व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त राहावी म्हणून प्रशासनाकडून जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी घेऊन, कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तो विभाग तातडीने "सील' करून सॅनिटाइझ करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

जिल्हा परिषदेतील एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे काही दिवस थांबवून, तो विभाग सॅनिटाइझ करणे गरजेचे आहे. कामापेक्षा कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी सांगितले.

पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांना काही दिवस घरी थांबविणे सर्वांच्या हितासाठी गरजेचे आहे. एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना काही दिवस घरी थांबण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for health check up of Nagar Zilla Parishad employees