esakal | कोरोनामुळे पाणीपट्टी माफ करा; संगमनेर नगरपालिकेकडे नागरिकांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Demand to Sangamner Municipality to waive water bill due to corona

कोविडच्या महामारीमुळे जागतिक स्तरावर मंदीसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे पाणीपट्टी माफ करा; संगमनेर नगरपालिकेकडे नागरिकांची मागणी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कोविडच्या महामारीमुळे जागतिक स्तरावर मंदीसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या संकटकाळात शहरातील सर्व व्यापारी, छोटेमोठे व्यावसायिकांसह नोकरदारांच्याही आर्थिक उत्पन्नावर प्रचंड ताण पडला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेने या वर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी साईराज फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी केली आहे.

या बाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीमुळे सध्या तरी जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सहा महिन्यांच्या काळात प्रस्थापित उद्योग व्यवसायांनाही घरघर लागली आहे. अनेक लोक सध्या घराघरातील आजारपण, बेरोजगारीमुळे आर्थिक ताणाताणीचे जीवन जगत आहेत. सामान्य नागरिकांचे जीवन संघर्षमय झालेले असून घर खर्च चालवणे सुद्धा मुश्कील झालेले आहे. सुमारे 60 ते 70 टक्के नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसली असून उपासमारीची वेळ आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असल्याने निवासी इमारती, व्यापारी संकुलाची भर पडत आहे. त्यातून पालिकेला वेळोवेळी घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्या माध्यमातून कर रुपाने जादा उत्पन्नही मिळालेले आहे. 

शहरातील विविध कामे तसेच नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो याची नागरिकांना जाणीव आहे. खर्च हि मोठ्याप्रमाणावर करावा लागतो याची हि नागरिकांना जाणीव आहे. मात्र कोरोना महामारीसारखी आपत्ती यापूर्वी कधीही आलेली नव्हती त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याबाबत विरोध केलेला नाही. या वेळी मात्र अनेकजण आर्थिकदृष्ट्या हतबल झाले असल्याने माणुसकीच्या दृष्टीने दिलासा देण्यासाठी पालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून एक नवीन आदर्श निर्माण करावा अशी विनंती केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर