महसूलमंत्री थोरातांना सेवा संस्थांच्या सचिवांचे साकडे; दिवाळीत २४ टक्के बोनस देण्याची मागणी

आनंद गायकवाड
Wednesday, 14 October 2020

नगर जिल्ह्यातील सेवा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सचिवांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी संगमनेर तालुक्यातील सेवा सोसायटी संघाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.

संगमनेर (अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील सेवा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सचिवांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी संगमनेर तालुक्यातील सेवा सोसायटी संघाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.

सध्या जिल्ह्यामध्ये एक हजार 150 संस्था कार्यरत असून या संस्थांचे कामकाज पाहण्यासाठी 590 सचिव कार्यरत आहेत. तसेच 201 संस्थांवर खासगी सचिव काम करीत आहेत. एका सचिवाकडे दोन ते चार संस्थांचे कामकाज असून त्यांना मिळणारे वेतन फार तुटपुंजे आहे. 2016 मध्ये संचालक मंडळाने या सचिवांना दोन टक्के प्रमाणे अंशदान देण्याचे ठरविले होते. मात्र ते मिळाले नसून, दिवाळीमध्ये 24 टक्के बोनस दिला आहे. परंतु कोरोना संकटात सचिवांनी जीव धोक्यात घालून शेतकर्‍यांना कर्ज वसुली व कर्ज वाटप केल्यामुळे या दिवाळीत 24 टक्के बोनस व दोन टक्के अंशदानाव्यतिरिक्त अनुदान देण्यात यावे. 

कोरोना काळात काम करणार्‍या सर्व सचिवांना कोविड अंतर्गत विमा संरक्षण मिळावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही थोरात यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. यावेळी तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, माजी तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, प्रकाश कडलग, मोहन पवार, अनिल दिघे, बाबासाहेब भवर, शांताराम सरोदे, विनायक भोकनळ, मुकुंद सातपुते आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Secretary of Service Institutions to Revenue Minister Balasaheb Thorat