संगमनेर आगारातून मुंबईला जाण्यासाठी बस सुरु करण्याची मागणी

आनंद गायकवाड
Friday, 25 September 2020

नाशिक, पुणे मुंबई या मोठ्या या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर या मध्यवर्ती शहरातून, राज्यभरातील महत्वाच्या शहरांना जोडणारे मार्ग जातात.

संगमनेर (अहमदनगर) : नाशिक, पुणे मुंबई या मोठ्या या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर या मध्यवर्ती शहरातून, राज्यभरातील महत्वाच्या शहरांना जोडणारे मार्ग जातात. या ठिकाणाहून मुंबईला जाणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस कोरोनाच्या संकटकाळात बंद करण्यात आल्या आहेत. देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी एसटी बस सुरु करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

संगमनेर तालुक्यातील शेडगाव, हंगेवाडी, अंभोरे, मालुंजे, प्रतापपूर, शिबलापूर, पिंप्रीलौकी अजमपूर, खळी, पानोडी, आश्वी आदी गावातून अनेकजण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, कल्याण, ठाणे व उपनगरांमध्ये राहण्यास आहेत. याशिवाय तालुक्यातील इतर गावातूनही मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती. सहा महिन्याच्या कालावधीनंतर काही अंशी वाहतूक सुरु झाली आहे. 

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधून, संगमनेर शहरात उभारण्यात आलेल्या राज्यातील हायटेक बसस्थानकातून पुणे येथे जाण्यासाठी तीन, नाशिकसाठी पाच, तसेच नगर, बीड, औरंगाबाद, पंढरपूर, सोलापूर, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे तसेच अकोले या दळणवळणासाठी दीडशे एसटी बस सुरु झाल्या आहेत.

संगमनेर आगारातून रात्री 10 वाजता श्रीरामपूर मुंबई ही एकमेव बस उपलब्ध आहे. या आगारातून मुंबईसाठी सुटणाऱ्या सकाळी पावणेआठ व सव्वाअकराच्या व रात्री दहाची बस बंद आहे. सध्या संगमनेरमधून तीन ते चार खासगी लक्झरी बस सुरु आहेत.

त्यामधून प्रवासासाठी प्रत्येकी पाचशे रुपये द्यावे लागतात. मुंबईला जाणाऱ्य़ा प्रवाशांची संख्या पाहता यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या या आगारातून मुंबईसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. 

प्रवाशी वर्गातून होणारी मागणी लक्षात घेवून या बाबत नगरच्या विभागीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, मुंबईसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. 
- बाबासाहेब शिंदे, आगार प्रमुख, संगमनेर आगार 
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to start bus from Sangamner depot to Mumbai