
ग्रामीण जनतेचे आरोग्य सांभाळणाऱ्या जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसते.
अहमदनगर : ग्रामीण जनतेचे आरोग्य सांभाळणाऱ्या जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसते. एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक त्रास सुरू झाल्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ येते. त्यामुळे जिल्हा परिषदेतच तातडीने प्रथमोपचार केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र व 55 उपकेंद्रे असून, त्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. 30) तातडीने उपचार न मिळाल्याने आरोग्य कर्मचारी नीलेश चौधरी यांचे निधन झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रथमोपचार केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषदेतील लिफ्टची मुदत संपली असून, कालबाह्य झाल्यामुळे ती कायमस्वरुपी बंद केलेली आहे. नवीन लिफ्ट बसविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्या, तरी त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नवीन लिफ्ट बसण्यास जून उजाडणार आहे. तोपर्यंत अधिकारी-पदाधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना जिन्याचाच वापर करावा लागणार आहे. त्यात ज्येष्ठांसह दिव्यांगांचे हाल होतात. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत प्रथमोपचार पेटी असणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्याला साधे खरचटले, तरी त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेत याआधी कर्मचारी व इतरांना प्रकृतीचा त्रास झाल्याने, दवाखान्यात न्यावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जिल्हा परिषद मुख्यालयात प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, असे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत प्रथमोपचार केंद्र सुरू करण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
संपादन : अशोक मुरुमकर