सर्पदंशाने म्हशीचा मृत्यू... पशुवैद्यकीय दवाखाना असता तर कदाचीत...

शांताराम काळे
Wednesday, 12 August 2020

मवेशी गावामध्ये स्वतंत्र पशुवैद्यकिय दवाखाना मंजुर करावा, अशी मागणी मवेशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील सर्वात मोठे गाव व असलेल्या मवेशी गावामध्ये स्वतंत्र पशुवैद्यकिय दवाखाना मंजुर करावा, अशी मागणी मवेशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले की, राजूरपासुन 10 ते 12 किलोमीटरवर असलेल्या मवेशी गाव 12 वाड्या-वस्त्यामध्ये विखुरलेले आहे. येथील नागरिकांचा मुळ व्यवसाय शेती व गुरे पालनाचा आहे. येथे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. प्रत्येक शेतकर्‍याकडे साधारणातः 8 ते 10 गावठी गाय, शेळ्या, कोंबड्या, बैल अशी जनावरे आहेत. डोंगराळ जमीन असल्याने चाराही मोठ्या प्रमाणात मिळतो. 

दिवसेंदिवस जनावरांची संख्या वाढत आहे. मात्र जनावरांसाठी कोणतीही शाश्‍वत वैद्यकिय सेवा उपलब्ध नाही. सद्यस्थितीत खडी येथे दवाखाना आहे. तो देखीलपाच किलोमीटरवर असल्याने तेथे आजारी जनावरांना घेऊन जाणे हे कसरतीचे व खर्चीक काम आहे.

पूर्वी या भागात पशुवैद्यकिय अधिकारी अकोल्याहुन जनावरांच्या उपचारासाठी येत असत. त्यानंतर काही दिवस खडकी येथील पशुवैद्यकिय अधिकारी येत असे. मात्र त्यांची बदली झाल्यापासुन व नव्याने पशुवैद्यकिय अधिकारी नसल्याने आता कोणीच आमच्या जनावरांना वैद्यकिय सेवा देण्यासाठी येत नसल्याचे किसन भांगरे यांनी सांगितले.

ते म्हणले 15 दिवसांपुर्वी 50 हजाराची म्हैस सर्पदंशाने मृत्युमुखी पडली. पण येथे दवाखाना असता तर तिच्यावर उपचार झाले असते. सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत. तरीही पाऊस वेळेवर नसल्याने शेतीची दुरावस्था झालेली आहे. दुग्ध व्यवसाय हाच एकमेव आम्हाला आधार आहे. पण आमच्या कोणत्याही जनावरांना प्राथमिक उपचार देखील येथे मिळत नाहीत.

आमदार डॉ. किरण लहामटे यांचेशी चर्चा झाली. पण अद्याप मुहूर्त लागेना, कि डॉक्टर येईना. अकोल्यात मोठा दवाखाना झाला तर तेथे जनावरे नाहीत व आमच्या भागात जनावरे आहेत तर त्यांचेवर उपचार करायला कोणी नाही अशी स्थिती आहे. अशाच पद्धतीने तालुक्यातील इतर लाखो रूपये खर्चुन बांधलेले पशुवैद्यकिय दवाखाने देखील शोभेच्या वस्तु बनल्या आहेत.

तरी मवेशी येथे स्वतंत्र पशुवैद्यकिय केंद्र सुरू व्हावे व याबाबत स्वतः जिल्हा पशुवैद्यकिय अधिकारी यांनी येऊन आमच्या विभागाची पाहणी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही ह.भ.प. प्रभाकरशेठ राऊत, शंकर भांगरे, सरपंच कमल बांबळे, रामनाथ भांगरे, पो.पा.धोंडु भांगरे, माजी सरपंच शरद कोंडार, सुरेश कोंडार, चंदर जाधव, नागु बांबळे, बाळु भांगरे, धोंडाबाई भांगरे आदीं शेतकर्‍यांनी केली आहे

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to start veterinary clinic in Maveshi in Akole taluka