ग्रामीण रुग्णालयात इतर उपचार सुविधेची मागणी

गौरव साळुंखे
Tuesday, 6 October 2020

ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांची गैरसोय होत असून त्यांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागते.

श्रीरामपुर (नगर) : शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उभारलेले कोविड सेंटर बंद करुन ग्रामीण रुग्णालयात इतर रुग्णांना उपचार सुविधा देण्याची मागणी पंचायत सामितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी केली आहे. यासंदर्भात उपसभापती तोरणे प्रसिद्धी पत्रक काढून ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केल्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची उपचारासाठी गैरसोय होत असल्याचे सांगितले आहे.

ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांची गैरसोय होत असून त्यांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागते. ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी महिलांसाठी प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर होणाऱ्या आरोग्य तपासण्यासह कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जात होती. तसेच बालकांसाठी लसीकरण, सर्पदंश, डाॅगबाईट उपचार सुविधा मिळत होत्या. परंतु ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु झाल्यापासुन इतर रुग्णांवर होणाऱ्या उपचार सुविधा बंद झाल्या आहे. शहरातील संतलुक रुग्णालयात 100 खाटांचे कोविड रुग्णालय असून शासकीय निधी अभावी ते अडचणीत आले आहे.
 
अजितदादा पाॅलिटेक्निक महाविद्यालयात 100 खाटांचे कोविड सेंटर सुरु असून तेथेही उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. शासकीय कोविड उपचार विभागापेक्षा शहरातील खाजगी कोविड रुग्णालयात अधिक रुग्ण उपचार घेत आहे. शहरातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या खासगी कोविड रुग्णालयांवर आरोग्य विभागाने नियंत्रण ठेवावे. तसेच ग्रामीण रुग्णालयात उभारलेले कोविड रुग्णालय संतलुक रुग्णालयासह डाॅ. आंबेडकर वस्तीगृह आणि अजितदादा पाॅलीटेक्निक महाविद्यालयात स्थलांतरीत करुन ग्रामीण रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी इतर आजारांवरील उपचार सुविधा देण्याची मागणी उपसभापती तोरणे यांनी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chairman of Panchayat Samiti Balasaheb Torne has demanded to provide treatment facilities to other patients in rural hospitals