मूकबधीर असतानाही झाला पदवीधर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

विलास आवारी यांनी राजेशला शिक्षणासाठी कोपरगावमधील लायन्स मूकबधिर विद्यालयात प्रवेश देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे व सचिव संजीव कुलकर्णी यांना विनंती केली.

नगर : सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिकून असामान्य यश मिळवणारे दिव्यांग मुले फार कमी असतात. दिव्यांग तत्त्वावर मात करत रांधे (ता. पारनेर) येथील मूकबधिर असलेल्या राजेश मधुकर आवारी या मुलांनी सामान्य मुलांच्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून भूगोल विषयात उच्च श्रेणी पदवी संपादन केली. त्याने मिळवलेल्या यशाची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. 

1996 च्या सुमारास मधुकर आवारी यांचा अपघात झाला यात ते गंभीर जखमी झाले होते त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र कोपरगाव येथील के.जी. सोमय्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आवारी रांधे येथे आले होते. त्यावेळी विलास आवारी यांच्या लक्षात आले की मधुकर आवारी यांच्या मुलाला बोलता व ऐकता येत नाही.

विलास आवारी यांनी राजेशला शिक्षणासाठी कोपरगावमधील लायन्स मूकबधिर विद्यालयात प्रवेश देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे व सचिव संजीव कुलकर्णी यांना विनंती केली. राजेशचे वय 8 महिन्यांनी जास्त असूनही डॉ. विलास आवारी यांच्या विनंतीमुळे त्याला प्रवेश मिळाला. दरम्यान राजेशच्या वडिलांची निधन झाले आई लिलाबाई आवारी यांच्यावर संसाराची जबाबदारी आली तरीही त्यांनी राजेशचे शिक्षण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कोपरगावमध्येच पूर्ण केले. जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात पाचवी व सहावी चे शिक्षण झाले. तत्कालीन उपसरपंच संतोष काटे यांनी त्याला नगरला आणले. सिताराम सारडा विद्यालयात त्यांने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

आठवीपासून तो सामान्य मुलांच्या शाळेत शिकू लागला. आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांने रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात पूर्ण केले. अळकुटी येथील विखे पाटील फाउंडेशनच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.त्याला दहावीला 82 टक्के गुण मिळाले होते. त्याला पदवी परीक्षेत बाराशे पैकी 763 गुण मिळाले. 

त्याला प्रा. डॉ. विलास आवारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक संतोष काटे, पंचायत समिती सदस्य रोहिणी काटे, मुख्याध्यापक भास्कर गुरसळ, मच्छिंद्र पाचोरे, आई लिलाबाई आवारी यांचे सहकार्य मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite being disabled, he became a young graduate