खाजगी संघासोबत सहकारी संघाकडूनही दूधदरात कपात

सूर्यकांत नेटके
Wednesday, 25 November 2020

नगर जिल्ह्यात दर दिवसाला 27 लाख लिटर तर राज्यात गाईंच्या दूधाचे एक कोटी 40 लाखापर्यत संकलन केले जात आहे. दहा ते पंधरा लाख लिटर दूधाचे उपपदार्थ केले जातात.

अहमदनगर : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लाॅकडाउन झाल्यानंतर दूधाची मागणी कमी झाली होती. मात्र आता गेल्या दोन महिन्यापासून दूधाला चांगली मागणी वाढलेली असतानाही दूध खरेदीदार संघाकडून दरात कपात केली जात आहे. मागील महिन्यात खाजगी संघानी दूधाचे दर कमी केल्यानंतर आता सहकारी संघही दूधाचे दर कमी करत आहेत. मागणी वाढूनही दूधाचे दर कमी केले जात असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. 

नगर जिल्ह्यात दर दिवसाला 27 लाख लिटर तर राज्यात गाईंच्या दूधाचे एक कोटी 40 लाखापर्यत संकलन केले जात आहे. दहा ते पंधरा लाख लिटर दूधाचे उपपदार्थ केले जातात. 70 ते 80 लाख लिटर दूध पिशव्यातून थेट ग्राहकांना 45 ते 50 रुपये दराने विकले जात आहे. मात्र अतिरिक्त दूधाच्या नावाखाली खाजगी खरेदीदार दूध संघाकडून सातत्याने दर पाडले जात आहे. सहा महिन्यानंतर गेल्या महिनाभरात आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर 25 ते 27 रुपये दूधाला दर मिळू लागला असतानाच महिन्यात खाजगी खरेदीदार संघाच्या संघटनेने 3.5 फॅट व 8.5 एसएनएफच्या दूधाची 24 रुपयापेक्षा (वाहतूक व कमीशनसह) खरेदी करु नये, असे संकलन केंद्रांना सांगितले. त्यानुसार दूध उत्पादकांना पुन्हा 20 ते 21 रुपये प्रती लिटरला दर मिळू लागला.

आता खाजगी संघासोबत सहकारी संघांनीही दूध दरात कपात सुरु केली आहे. दूध उत्पादक पुरवठा करत असलेल्या दूधापैकी 60 टक्के दूधाला (3.5 फॅट व 8.5 एसएनएफ) प्रती लिटर 20 रुपये व 40 टक्के दूधाला 25 रुपये दर दिला जाणार असल्याचे संगमनेर (जि. नगर) तालुका दूध संघाने जाहीर केले आहे. दूध संकलन केंद्रांना याबाबत पत्र काढले आहे. 1 नोव्हेंबरपासून हे दर लागू पडतील असे संघाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अतिरिक्त दूधाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने दूध भुकटी रुपांतर योजना कुचकामी ठरत आहे.

ठरवून दूध उत्पादकांची लूट 
 

दहा महिन्यांपूर्वी राज्यात दूधाला 32 रुपये दर होता. कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्याने मागणी कमी झाल्याचे सांगत खरेदीदार संघाकडून थेट 17 ते 18 रुपयांवर दर आणले. आता दोन महिन्यांपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली आहे. शिवाय आठ महिन्यांच्या तुलनेत दूध भुकटीचे दरही बऱ्यापैकी वाढले आहेत. त्यामुळे काहीसे दर वाढत असतानाच पुन्हा गेल्या महिन्यात दिवाळीच्या तोडांवर राज्यातील सर्वच खाजगी दूध खरेदीदार संघाकडून दरकमी केले. त्यामुळे आता पुन्हा 25 रुपयाचा दर पुन्हा 20 रुपयांवर आला आहे. खाजगी संघाकडून ठरवून दर पाडणे म्हणजे ठरवून दूध उत्पादकांची लूट केली जात असल्याचा दूध उत्पादक शेतकरी आरोप करत आहेत.

दूधाला प्रती लिटर 35 रुपये उत्पादन खर्च शासनानेच जाहीर केलेला असताना केवळ 18 ते 20 रुपये दराने दूधाची खरेदी होतेय. तेच दूध संघाकडून 50 रुपये लिटर विकले जातेय. मधील 30 रुपये कुठे जातात याचा सरकारने कधी विचार केला आहे का. मागणी असतानाही दर पाडून दूध धंदा मोडीत काढण्याचा डाव तर नाही ना असा प्रश्न पडत आहे. सरकारने दूध उत्पादक उध्वस्त होत आहेत, याचा कधी तरी विचार करावा.
- गुलाबराव डेरे, अध्यक्ष- कल्याणकारी दुध उत्पादक संघ, नगर

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite good demand for milk for the last two months the price is being reduced by the milk buying team