२२ कोटी मंजुर असूनही राज्यमार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेना

आनंद गायकवाड
Wednesday, 11 November 2020

रस्ते हे ग्रामीण व शहरी भागातील दळणवळणासाठी जीवनवाहिन्या आहेत. अनेक वर्षापासून देखभाल दुरुस्ती अभावी जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांची धुळधाण झाली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : रस्ते हे ग्रामीण व शहरी भागातील दळणवळणासाठी जीवनवाहिन्या आहेत. अनेक वर्षापासून देखभाल दुरुस्ती अभावी जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांची धुळधाण झाली आहे.

नाशिक व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या नांदूर शिंगोटे ते लोणी, कोल्हार या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आगामी दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार होते. मात्र या कामाला कार्यारंभ आदेश देवूनही अद्याप सुरवात न झाल्याने, जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. 

नांदुर शिंगोटे ते लोणी या सुमारे चाळीस किलोमिटर लांबीच्या रस्त्यावर संगमनेर तालुक्‍यातील पळसखेडे, निमोण, नान्नज, तळेगाव दिघे, या गावांचा समावेश होतो. या गावांना दळणवळणाच्या सोईसाठी महत्वाचा असलेला हा राज्यमार्ग गेल्या तीन चार वर्षांपासून लहान मोठ्या खड्ड्यांनी व्यापल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा पाठपुरावा केला होता. त्यात सेवानिवृत्त अभियंता, सामाजिक कार्यकर्ते हरिश्‍चंद्र चकोर आघाडीवर होते. या क्षेत्रातील माहितगार व अभ्यासक असल्याने त्यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या कामासाठी नाशिकच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने निविदा मंजूर करुन, कार्यारंभ आदेशही दिल्याने लवकरच या कामाला सुरवात होण्याची अपेक्षा होती. 

या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम आठवडाभरातच सुरू होणार असल्याचे संबंधित कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक व उपअभियंता यांनी वारंवार सांगितले होते. मात्र संबंधित कंत्राटदारांना दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश देऊनही, रस्त्याचे काम सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही प्रत्यक्षात दिसून येत नसल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.

या अंतर्गत सुमारे सात मिटर रुंदीचे दोन अस्तरांचे डांबरीकरण, दुतर्फा साईडपट्ट्या असे कामाचे स्वरुप आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी या गावांमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी जागरुक राहणे आवश्‍यक आहे. दर्जा अथवा साहित्याबद्दल शंका असल्यास चकोर यांच्याशी किंवा थेट राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चकोर यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the sanction of Rs 22 crore there was no time to repair the state highways