Video : देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम

 एकनाथ भालेकर
Friday, 22 January 2021

अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे जाहीर केले.

राळेगण सिद्धी : केंद्रिय कृषीमंत्र्यांचे पत्र घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ   शेतक-यांच्या प्रश्नी चर्चा झाली. परंतु, मी माझ्या ३० जानेवारीच्या उपोषणावर ठाम आहे. त्यात काही बदल नाही, असे सांगत  अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे जाहीर केले.

स्वामिनाथ आयोगानुसार शेतीमाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी यासाठी  ३० जानेवारीपासून हजारे यांनी राळेगण सिद्धीत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर  फडणवीस यांनी  आज ( ता. २२ ) सायंकाळी उशीरा राळेगण सिद्धीत येऊन हजारे यांची भेट एक तास चर्चा केली. आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबुराव पाचर्णे आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा निरोप घेऊन आपण हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी उपस्थित केलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांसंर्भातील ९ मुद्दयांवर सविस्तर चर्चा करून ते समजून घेतले.  अण्णांच्या काही पत्रांना केंद्राकडून उत्तर दिले. परंतु, अण्णांना थातूरमातूर उत्तर देणे योग्य नसल्याने व काही बाबी या धोरणात्मक असल्याने अण्णांची भूमिका मी समजून घेतली असून ती केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे मांडणार आहे. केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करून अण्णांनी मांडलेल्या शेतक-यांचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तसेच कृषीमंत्री तोमर अण्णांच्या पत्रांना सकारात्मक व ठोस निर्णयाचे उत्तर देण्यासाठी प्रयत्नशील  आहेत. हजारे यांच्या राळेगण सिद्धीतील मागील उपोषणाच्या वेळी आपण लोकायुक्त कायद्यासाठी मसुदा समितीच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आमचे राज्य सरकार बदलले. सध्याचे सरकार लोकायुक्त कायद्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजत आहे, असे फडणवीस म्हणाले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मन वळवून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली का ? असे पत्रकारांनी विचारले असता  ही फक्त सुरूवात आहे. अण्णा  हे समाज व महाराष्ट्राचे भुषण आहेत. त्यांनी उपोषण करावे ही राज्यातील व देशातील कोणाचीही इच्छा नाही. त्यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले. 

व्हिडिओ - 

>

संपादन -  अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis meets anna hazare in ralegan siddhi