शनिमंदिराच्या बांधकामालाच साडेसाती, कोरोनाने आणली आफत

Devotees are being inconvenienced due to delay in construction of old Shanimaruti temple at Shevgaon.jpg
Devotees are being inconvenienced due to delay in construction of old Shanimaruti temple at Shevgaon.jpg

शेवगाव (अहमदनगर) : शहरासह तालुक्याचे श्रध्दास्थान असलेल्या जुन्या शनिमारुती मंदिराचे बांधकाम पाडून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. लोकवर्गणीतून होणा-या या कामासाठी कोरोनानंतरच्या टाळेबंदीमुळे निधीसंकलनात अडचणी आल्याने हे काम रखडले आहे. मात्र त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय शहरातील मंगल कार्यालयात पार पडणा-या विवाहातील नवरदेवास दर्शनासाठी हनुमान उपलब्ध नसल्याने गावाबाहेरील हनुमान मंदिराचा आश्रय घ्यावा लागत आहे. 

शहरातील मुख्य पेठेत नगरपरिषद कार्यालयाजवळ असलेले पुरातन पेशवेकालीन शनिमारुती मंदिर सर्वधर्मिय भाविकांचे श्रध्दास्थान आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिर परिसरात गणपती, शनि, मारुती, लक्ष्मीनारायण, श्री दत्त, तुळजाभवानी देवी, महादेव, विठ्ठल रुख्मिणी- श्रीकृष्ण, मुंजोबा अशा दहा देवतांची मंदिरे आहेत. एका जागी असलेल्या या विविध देवतांच्या मंदिरांमुळे सकाळी व संध्याकाळी पुजा - आरती करुन दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या मोठी होती. ज्येष्ठ नागरीकांसाठी येथे नियमीत सुरु असलेले धार्मिक कार्यक्रम विरंगुळा देणारे असत. मंदिर परिसरातील पुरातन पाण्याची बारव पाणी पुरवठा करण्यासाठी उपलब्ध असल्याने परिसरातील व्यावसायिक व दुकानदारांचाही तेथे दिवसभर वावर असे. 

खूप वर्षापासून या मंदिर समुहामुळे परिसरात पानफुल यासह धार्मिक साहित्य विक्रीचे व्यवसाय उभे राहीले आहेत. शहरातील सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते व गावक-यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पुरातन जुनी झालेली व मोडकळीस आलेली ही मंदिरे पाडून त्याजागी सात कोटी रुपये खर्चुन प्रशस्त असे देवालय उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी झालेल्या पहिल्याच बैठकीत २० लाख ५० हजाराचा निधीही जमा झाला होता.

त्यातून ही मंदिरे काढून जागेची व बारवेची साफसफाई करुन पाया खोदण्यात आला. तर वाळू, खडी, डबर, सिमेंट असे साहित्य खरेदी करुन कामास सुरुवात करण्यात आली. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोना संसर्गाने शासनाने टाळेबंदी घोषित केली. शहरातील उदयोग व्यवसाय बंद झाल्याने वर्गणी व बांधकाम ही थांबवावे लागले. आता मंदिर पाडून दीडवर्षाहून अधिक कालावधी उलटला असून या जागेवर बांधकामाअभावी आलेली आवकळा, जुन्या जाणत्या ज्येष्ठ भाविकांना पाहवत नाही. 

मंदिर पाडण्यापूर्वी निधीचा व येणा-या अडचणीचा संपुर्ण विचार करायला हवा होता. भाविकांचा श्रध्देचा विषय असल्याने याबाबत तरुण कार्यकर्त्यांनी घाईगडबडीत निर्णय घेतल्यांने सध्या शहरातील भाविकांची मोठी कुचंबना होत आहे.

येथील सर्व देवतांच्या मूर्ती विधीवत पुजा करुन एका जागी नेवून ठेवण्यात आल्या असल्या तरी आणखी किती काळ त्यांना असे अज्ञातवासात रहावे लागेल. याचे उत्तर कोणाकडेही नाही. शहरातील नियमीत होणा-या विवाहांतील वरासाठी दर्शन घेवून विवाह विधी पार पाडण्यासाठी हनुमानाचे हे मंदिर उपलब्ध नसल्याने आजुबाजूच्या वाडीवस्तीवरील व उपनगरातील मंदिराचा शोध घ्यावा लागत आहे. तरी या मंदिराचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, अशी मागणी शहरातील भाविकांमधून होत आहे.

शहरातील सर्व धर्मिक नागरीकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिरासाठी सर्वांनी यथाशक्ती व टप्याटप्याने लोकवर्गणी देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक कारणामुळे अडचणी आल्या असल्यातरी शहराच्या वैभवात भर पडेल असे उत्कृष्ट व प्रशस्त देवालय लवकरच उभे राहील. 
- अरविंद पटेल, सदस्य, शनि मारुती मंदीर देवस्थान समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com