मोठी बातमी! प्रशासन सहकार्य करत नसल्याने नऊ गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीचा राजीनामा?

शांताराम काळे
Tuesday, 25 August 2020

भंडारदरा, घाटघर, बारी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नसल्याने नऊ गावातील सरपंच व कोरोना आपत्कालीन समितीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा, घाटघर, बारी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नसल्याने नऊ गावातील सरपंच व कोरोना आपत्कालीन समितीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पेसां महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग भांगरे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

भंडारदरा, घाटघर, कोल्टेंभा, घाटघर, रतनवाडी, बारी, वरूंघुशी आदी नऊ गावातील स्थानिक कोरोना कमिटी नाराज आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही येणारी गर्दी कमी होत नसल्याने या भागातील जनता भयभीत झाली आहे. 

भंडारदरा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन येथील जनजीवन विस्कळीत करीत आहेत. पोलिस प्रशसनाने त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी अपुरे, वाहने नाहीत. त्यामुळे पर्यटक नियंत्रण होणे अशक्य नाही.

तालुका व जिल्हा प्रशासनाने याबाबीकडे गांभीर्याने पाहून स्वतंत्र यंत्रणा पाठवून येणारे लोंढे थांबवावेत. कोरोना रोखण्यासाठी आवश्‍यक असलेली साधन सामुग्री उपलब्ध करून द्यावी व आदिवासी भागात नव्याने कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पेसा सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग भांगरे, अरविंद खाडे, गणपत खाडे, आनंदा खाडे, किरण खाडे, किसन खाडे, लक्ष्मण खाडे, यशवंत खाडे, किसन अंबावने. गोगा बुळे गणपत दिघे आदी २५ आदिवासी ग्रामस्थांनी निवेदन देऊन प्रशासन काम करीत नसेल तर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

मात्र अद्याप त्याच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने गावाचे आरोग्य बिघडल्यास त्यास प्रशासन व सरकार जबाबदार असेल असेही निवेदनात म्हटले आहे. आज राजूर येथे पेसा सरपंच परिषदेची बैठक होणार असून गाव प्रवेश बंद करून येणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केल्याशिवाय राजीनामे मागे घेणार नसल्याचे भूमिका घेण्यात येणार असल्याचे पांडुरंग खाडे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster management committees in nine villages resign due to lack of cooperation from the administration