esakal | प्रत्येक पक्षात आहेत "नाथाभाऊ"
sakal

बोलून बातमी शोधा

Disgruntled leaders like Eknath Khadse in all parties

बलाढ्य मंडळींनी पक्षांतर केले, की मूळच्या निष्ठावंतांची कुचंबणा होते. निष्ठावंतांनी पक्षविस्तारासाठी केलेला संघर्ष, त्यामुळे झालेले नुकसान, आंदोलनामुळे सोसावा लागलेला तुरूंगवास, हे सर्व काही विसरून नव्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.

प्रत्येक पक्षात आहेत "नाथाभाऊ"

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः केडरबेस ओळख असलेला भाजप असो, वा उदारमतवादी कॉंग्रेस किंवा शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे प्रादेशिक पक्ष. त्यात धमक असणाऱ्या कोणावर तरी "नाथाभाऊ' होण्याची वेळ येतेच; कारण राजकारणात कुणाची ना कुणाची घुसमट होतच असते.

धमक असलेले नाथाभाऊंसारखी वेगळी वाट धरतात, तर कुणी विचारधारा कायम ठेवून वेगळी चूल मांडतात. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. 

योगायोग असा, की शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विश्रामगृहे आणि राजकीय घुसमट, याचे नाते फार जवळचे. कॉंग्रेसचे आमदार असताना विखे पाटील हे सत्तेचा सोपान चढण्यासाठी शिवसेनेत गेले. त्यावेळी घुसमट हा मुद्दा नव्हता. मात्र, कॉंग्रेसमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना, त्यांना पक्षांतर्गत स्पर्धेला तोंड द्यावे लागणार होते. त्याच वेळी चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांना खासदार करायचे होते.

एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर लढताना घुसमट होऊ लागली. संभाव्य मंत्रीपद, खासदारकी साधण्यासाठी त्यांनी कमळ हाती घेतले. योगायोग असा, की हा निर्णय घेण्यापूर्वीची महत्त्वाची बैठक शिर्डीच्या विश्रामगृहावर झाली. 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना नाथाभाऊ शिर्डीत आले, की याच विश्रामगृहावर थांबत.

आणखी एक विलक्षण योगायोग असा, की ज्यांनी जनसंघ, भाजपच्या विस्तारासाठी आयुष्य वाहिले, त्या दिवंगत खासदार सूर्यभान वहाडणे पाटील यांनीही घुसमट होत असल्याच्या कारणास्तव भाजपमधील ज्येष्ठांना याच विश्रामगृहावरून साद घातली. मराठवाड्यातील माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांचा अपवाद वगळता, त्यावेळी तेथे कुणी आले नाही, हा भाग वेगळा. 

वहाडणे यांचे चिरंजीव विजय वहाडणे यांनीही कोपरगावात भाजपसाठी खस्ता खाल्ल्या. भाजप सत्तेत आला. मातब्बर राजकीय घराण्यातील स्नेहलता कोल्हे भाजपमध्ये दाखल झाल्या. घुसमट वाढल्याने वहाडणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारमंचाची स्थापना करीत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. मात्र, आमदार आशुतोष काळे आणि कोल्हे घराण्यातील लढाईत वहाडणे यांना विधानसभेला टिकाव धरता आला नाही. 


बलाढ्यांच्या पक्षांतरामुळे निष्ठावंतांची कुचंबणा! 
बलाढ्य मंडळींनी पक्षांतर केले, की मूळच्या निष्ठावंतांची कुचंबणा होते. निष्ठावंतांनी पक्षविस्तारासाठी केलेला संघर्ष, त्यामुळे झालेले नुकसान, आंदोलनामुळे सोसावा लागलेला तुरूंगवास, हे सर्व काही विसरून नव्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. जेथे राजकीय समीकरणे बदलतात, तेथील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अशी घुसमट सहन करण्याची वेळ येते. फरक एवढाच, की घुसमट सोसणाऱ्या सर्वांकडेच नाथाभाऊंसारखी वेगळी वाट धरण्याची क्षमता नसते. 

संपादन - अशोक निंबाळकर