श्रीरामपुरात उफाळली राजकीय भाऊबंदकी, नवले चुलते-पुतणे भिडले

गौरव साळुंके
Thursday, 3 September 2020

पोलिस पथक तातडीने घटनास्थळी गेल्याने दोघांचे समर्थक पसार झाले. हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. पोलिस आल्याने वाद आटोक्यात आला. यानंतर सुधीर नवले यांचे समर्थक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिस ठाण्यात पुन्हा दोघांच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी खाक्या दाखविला.

श्रीरामपूर ः तालुक्यातील बेलापूर येथे राजकीय भाऊबंदकी उफाळली आहे. जिल्हा परिषदेच्या वादातून ही ठिणगी पडली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात आज वादावादी झाली. त्यानंतर दोघांच्या समर्थकांच्या हाणामारी झाल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मध्यस्थीनंतर वादावादीवर पडदा पडला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

शरद नवले आणि सुधीर नवले हे चुलते पुतणे आहेत. त्यांच्यात राजकीय वाद आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. दोघांमध्ये बेलापूर ग्रामपंचायतीवरून वाद आहे. स्थानिक राजकारणात नेहमी आरोप-प्रत्यारोप होत असतात.

नुकतेच ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. विकासकामाची बिले काढण्यावरून दोन दिवसांपासून दोघांत वाद होते. सुधीर नवले आज सकाळी ग्रामपंचायतीत बसलेले असताना शरद नवले तेथे गेले. दरम्यान, सुधीर नवले यांच्यासोबत ठेकेदारही बसलेले होते. त्यावेळी शरद नवले यांनी आक्षेप घेतला. त्याला सुधीर नवले यांनी प्रत्युत्तर दिले.

दोघांत शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर शरद नवले निघून गेले. सदर प्रकार समजताच सुधीर नवले यांचे समर्थक शरद नवले यांच्या भावाच्या दुकानासमोर गेले. त्यावेळी तेथे शरद नवले यांचेही समर्थक जमले. त्यामुळे दोघांच्या समर्थकांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. सदर माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिस पथक तातडीने घटनास्थळी गेल्याने दोघांचे समर्थक पसार झाले. हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. पोलिस आल्याने वाद आटोक्यात आला. यानंतर सुधीर नवले यांचे समर्थक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिस ठाण्यात पुन्हा दोघांच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी खाक्या दाखविला.

पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी जावुन दोघांच्या समर्थकांना पोलिसी खाक्या दाखविला. अखेर सुनील मुथा यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला. पोलिसांनी शरद नवले, नितीन नवले तसेच सुधीर नवले, अनिल नवले यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. अहमदनगर

- संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute among Navale supporters in Shrirampur