साई संंस्थान रूग्णालयातील राखीव खाटांवरून कोपरगाव-शिर्डीकरांत जुंपली

सतीश वैजापूरकर
Saturday, 19 September 2020

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये रुग्णालयासाठी दिले. आता या रुग्णालयावरून वादंग पेटले आहे. कोपरगावच्या रुग्णांना येथे राखीव कोटा ठेवावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली.

शिर्डी ः वेळेवर उपचार न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले. आमदार, साखर कारखानदार व दूध संघाच्या धुरिणांनी एकत्र येऊन तालुकापातळीवर व्हेंटिलेटरची सुविधा व अतिदक्षता विभाग असणारी रुग्णालये उभारली, खासगी डॉक्‍टरांनी त्याला साथ दिली, तर अशा दुर्घटना टळू शकतील, असा संदेश या घटनेने दिला. आता साईसंस्थानच्या रुग्णालयावरून कोपरगावकर व शिर्डीकरांत (गुरुवार)पासून वादंग पेटले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यात सुसज्ज कोविड रुग्णालयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

शिर्डीतील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काल (ता. 17) प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याशी चर्चा केली. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याकडे कुठल्याही संस्था नसताना ते कोविड सेंटर सुरू करतात; मग कोपरगावसह अन्य तालुक्‍यांतील आजी-माजी आमदारांनी एकत्र येऊन तेथे अशी रुग्णालये सुरू करायला काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये रुग्णालयासाठी दिले. आता या रुग्णालयावरून वादंग पेटले आहे. कोपरगावच्या रुग्णांना येथे राखीव कोटा ठेवावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली.

शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी त्यास लागलीच विरोध केला. हे रुग्णालय येथील रुग्णांना पुरत नाही. साईसंस्थानचे आठ डॉक्‍टर, 40 कर्मचारी बाधित झाले. पहिल्याच दिवशी एका वेळी चार रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली. त्यामुळे या सुविधेची क्षमता लगेच संपली. कोपरगावचे रुग्ण आले, तर येथील यंत्रणा कोलमडून पडेल, अशी भीती नगराध्यक्ष कोते यांनी व्यक्त केली.

नगरसेवक अभय शेळके, शिवाजी गोंदकर, नीलेश कोते, सुजित गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, कमलाकर कोते, सचिन कोते, संजय शिंदे, विजय जगताप आदी उपस्थित होते. 

संगमनेर तालुक्‍यात खासगी डॉक्‍टर अत्यंत चांगल्या पद्धतीने कोविड रुग्णालये चालवितात. जिल्ह्यातील साखर कारखानदार, आमदारांनी आता पुढे यावे. तालुकापातळीवर व्हेंटिलेटर व प्राणवायूची सुविधा असलेली रुग्णालये उभारावीत.

खासगी डॉक्‍टरांना पुढे येण्यास प्रोत्साहन द्यावे. त्याशिवाय शहरातील रुग्णालयांवरील भार कमी होणार नाही. अन्यथा, येत्या काही दिवसांत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. 
- डॉ. एकनाथ गोंदकर, माजी विश्वस्त, साईसंस्थान 

साईसंस्थानच्या रुग्णालयासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 लाखांचा स्थानिक विकास निधी दिला. प्रवरा ग्रामीण रुग्णालय व विळद घाटात कोविड रुग्णालये सुरू केली. याचा धडा इतर आमदार व कारखानदारांनी घ्यावा. कोपरगावसह प्रत्येक तालुक्‍यात तातडीने रुग्णालये सुरू करावीत. 
- कैलास कोते, माजी नगराध्यक्ष 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between Kopargaon-Shirdikar over reserved beds in Sai Sansthan Hospital