
कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर माणसे माणसांपासून दुरावत चालली आहेत.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर माणसे माणसांपासून दुरावत चालली आहेत. गरीब भटक्या कुटुंबांना रोजगार मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत भटक्या, वंचित परिवारांना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून काही प्रमाणात मदत करता येते. त्यांना आरोग्य सेवा पुरवता येते याचे समाधान मोठे आहे, असे प्रतिपादन आनंदसिंधू अनाथ आश्रमाचे संस्थापक विलास महाराज लोंढे यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) परिसरात पालांवर राहणाऱ्या भटक्या कुटुंबांना अॅड. कृष्णा झावरे, प्रसाद खिलारी, साजन आहेर, सोन्याबापू झावरे, महावीर चंडालीया यांच्या सहकार्याने पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे व सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनावळे यांच्या हस्ते तांदूळ, कपडे, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी लोंढे बोलत होते.
दिवाळीपासून,गेल्या महिनाभरात पारनेर तालुक्यासह आळेफाटा (पुणे) परिसरातील सुमारे साडेपाचशे पालावर राहणाऱ्या भटक्या कुटुंबांना दिवाळी फराळ, कपडे वाटप करण्यात आले असल्याचे लोंढे यांनी यावेळी सांगितले.
झावरे म्हणाले की,फिनीक्स परिवार व आनंदसिंधू आश्रमाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून समाजातील अनाथ वृध्दांना प्रत्येक महिन्याला अन्न धान्य पुरवण्यात येते.ज्या वृध्दांना स्वयंपाक करणे शक्य नसते अशा वृध्दांना त्यांच्या घरी जेवण पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येते.
संपादन : अशोक मुरुमकर