संगमनेरमध्ये महाविद्यालयांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य किटचे वाटप

आनंद गायकवाड
Saturday, 21 November 2020

राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाने राज्यातील महाविद्यालयातील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून ( ता. 23 ) सुरु होत आहेत

संगमनेर (अहमदनगर) : राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाने राज्यातील महाविद्यालयातील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून ( ता. 23 ) सुरु होत आहेत. त्या निमित्ताने तालुक्यातील तळेगाव दिघे येथील साईबाबा हॉस्पिटलचे संचालक व अन्याय अत्याचार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोडगे यांनी तळेगाव पंचक्रोशीतील सर्व विद्यालयांना कोरोना प्रतिबंधक आरोग्य साहित्याची भेट दिली. 

राज्यातील महाविद्यालयात कोविडच्या पार्श्वभुमिवर नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रशासनाने पूर्वतयारी सुरु केली आहे. त्यासाठी वर्गखोल्यांचे निर्जंतूकीकरण, स्वच्छता मोहिम सुरु झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नंदकुमार गोडगे यांनी या कामी सहकार्याचा हात पुढे केला असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तळेगाव दिघे परिसरातील शाळांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, सोडियम हायड्रॉक्लोराईड, थर्मामीटर व विद्यार्थ्यांसाठी मास्क आदी वस्तूंचे मोफत वितरण केले आहे.

तळेगाव दिघे येथील साईबाबा हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संबंधित विद्यालयांच्या प्राचार्यांना हे आरोग्य कीट देण्यात आले. याप्रासंगी तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्राचार्य हरिभाऊ दिघे, सचिन दिघे, संजय दिघे, गणेश दिघे, चांगदेव दिघे, रावसाहेब जगताप, अशोक जगताप आदींसह शिक्षक वृंद व आरोग्यसेवक उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of Corona Preventive Health Kits to colleges in Sangamner