
तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी आत्मनिर्भर योजनेमधून ऑगस्टपासून धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संगमनेर ः लॉकडाउनमुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. त्यामुळे घरातील चूल पेटणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गोरगरिबांना विविध प्रकारे मदत देण्यास सुरूवात केली आहे. अनाथ, पथविक्रेते, दिव्यांग, आदिवासींसाठी या योजना आहेत. या योजनांमार्फत त्यांच्या घरातील चूल पेटावी अशी व्यवस्था सरकारने केली आहे. दिव्यांगासाठी आत्मनिर्भर योजना आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील दिव्यांग लाभार्थींसाठी धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी आत्मनिर्भर योजनेमधून ऑगस्टपासून धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, राष्ट्रीय संस्था, तसेच विविध सामाजिक संस्था आणि समाजकल्याण विभागाकडून घेऊन धान्यवितरण करण्यात येईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधून कोणताच लाभ मिळत नसलेल्या या लाभार्थींना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू महिन्यापासून तत्काळ लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थींनी जवळचे शासकीय धान्यवितरण केंद्र किंवा संगमनेर तहसील कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
संपादन - अशोक निंबाळकर