

अहमदनगर : दीपावलीनिमित्त नगरच्या बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या साहित्याला मागणी नेहमीप्रमाणेच आहे. विविध प्रकारचे आकर्षक दिवे गुजरातहून, तर चिनी मातीच्या, लाल मातीच्या पणत्या बंगालमधील सिलिगुडीहून आल्या आहेत. पूजनासाठी आवश्यक असणारी लक्ष्मी (झाडणी) मध्य प्रदेशामधील इंदूरमधून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मागील वर्षीप्रमाणे दरात थोडी वाढ झाली असली, तरी मागणी कमी असल्याने कमी नफ्यात माल विकण्याची वेळ आली आहे.
लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीमूर्ती, लाह्या, हळदी-कुंकू, लक्ष्मी (झाडणी), बोळकी, लहान-मोठ्या पणत्या, असे विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. हे साहित्य महाराष्ट्रातही तयार होत असले, तरीही याचे विक्रेते इतर राज्यांतील आहेत. विशेषतः गुजरात, मध्य प्रदेशामधील ही मंडळी आहे. एकाच वेळी अनेक जणांसाठी ठोक माल खरेदी केल्यामुळे तो अत्यल्प दरात मिळतो. हा माल आकर्षकही असतो. त्यामुळे बाजारपेठेत याच मालाची चलती दिसून येत आहे.
आकाशकंदिलांनाही मागणी दरवर्षीप्रमाणे आहे. मात्र, जास्त किमतीचे आकाशकंदील विकले जात नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मध्यम आकाराच्या, ३०० ते ५०० रुपये दरातील आकाशकंदिलांना चांगली मागणी आहे. काही ठिकाणी घरीच हाताने बनविलेले कलाकुसरीचे दिवेही उपलब्ध आहेत; परंतु त्यांचा दर जास्त असल्याने विक्री कमी आहे. तथापि, काही लोक आवर्जून स्थानिक दिव्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहे.
रस्त्यावर बसलेल्या गरीब लोकांकडून दिवाळीचे साहित्य खरेदी करावे, असे आवाहन सामाजिक संस्था करीत असतात. अनेकांनी सोशल मीडियावर अशा पद्धतीने आवाहन केले होते, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असून, अशा लोकांची विक्रीही बऱ्यापैकी होत आहे. विशेषतः अशा ठिकाणी संबंधित कुटुंबे लहान मुलांसह उपस्थित असतात. कोरोनाच्या काळातही ही मुले आई-वडिलांना मदत करतात, हे पाहून अनेक जण जास्त घासाघीस न करता खरेदी करतात, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.
चिनी मातीचे तुळशीवृंदावन
यंदा लहान आकारातील तुळशीवृंदावन बहुतेक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे. अशा पद्धतीचा बहुतेक माल सिलिगुडीहून येत आहे. हे दिसण्यास आकर्षक आहेत. त्यावर रंगीत दिवे सोडल्यास अधिक चांगले दिसते, असे म्हणत विक्रेते विक्री करीत आहेत. हे चिनी मातीचे आहे. शो-पीस म्हणूनही त्याचा वापर होत आहे.
अशा आहेत किमती
लक्ष्मीमूर्ती ४० ते २०० रुपये, लाह्यांचा पुडा १०, लक्ष्मी (झाडणी) ५० ते ९०, बोळकी (५ नग) ५० ते १५०, पणत्या (डझन) ४० ते १५०, चिनी मातीच्या आकर्षक पणत्या (१ नग) २० ते ५०, आकाशदिवे लहान कागदी (डझन) ३० ते १००, आकाश कंदील ३०० ते १०००.
"यंदा विक्री जास्त होत नाही. त्यामुळे आणलेला माल पन्नास टक्के दर कमी करून विकण्याची वेळ आली आहे. हा माल वर्षभर सांभाळून उपयोग नाही. ठेवण्यासाठी जागा नाही, तसेच सांभाळणे अवघड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मालाच्या विक्रीचे नियोजन करीत आहोत. ग्राहक नेहमीप्रमाणे असले, तरीही कमी दरात वस्तू घेण्याकडे यंदा लोकांचा कल आहे."
- राजूकुमार वर्मा, विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.