esakal | पाचपुते गटाकडून डावपेच टाकले जात असतानाच जगताप गटाची फिल्डींग; श्रीगोंद्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व
sakal

बोलून बातमी शोधा

Dominance of Congress and NCP in Shrigonda Agricultural Produce Market Committee

राजकीय पोक्तपणा दाखवित माजी आमदार राहुल जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज केली.

पाचपुते गटाकडून डावपेच टाकले जात असतानाच जगताप गटाची फिल्डींग; श्रीगोंद्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : राजकीय पोक्तपणा दाखवित माजी आमदार राहुल जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज केली. बाजार समितीवर कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. संजय जामदार यांची सभापतिपदी, तर संजय महांडुळे यांची उपसभापतिपदी निवड झाली. त्यांनी आमदार पाचपुते गटाचे लक्ष्मण नलगे व वैभव पाचपुते यांचा पराभव केला. 

बाजार समितीच्या राजकीय चर्चेला या निवडींनी पूर्णविराम मिळाला. समितीच्या गोदामात सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सभापतिपदासाठी अर्ज दाखल करतानाच, जगताप गटात फूट पडली होती. जामदार व नलगे यांचे सभापतिपदासाठी, तर उपसभापतिपदासाठी महांडुळे व पाचपुते यांचे अर्ज दाखल झाले. जगताप गटाच्या मीना आढाव यांनी दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली. 

आढाव यांच्यासोबत काही मते गेल्यास, त्याचा सरळ फायदा पाचपुते गटाला होणार होता. मात्र, याही स्थितीत जगताप यांनी त्यांच्याकडील राजकीय अस्त्रे वापरुन आढाव यांना मानणारी मते जामदार यांच्या पारड्यात पाडण्यात यश मिळविले. जामदार यांना 10, नलगे यांना 7, तर आढाव यांना 1 मत मिळाले. उपसभापती निवडीत महांडुळे यांना 10, तर पाचपुते यांना 8 मते मिळाली. 

पाचपुते गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, जगताप यांचा राजकीय पोक्तपणा या निवडीत दिसून आला. काही महिन्यांपूर्वी पंचायत समितीची सत्ता पाचपुते यांच्याकडून काढून घेताना, तेथे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज समितीत झाली. 

जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकारणाविषयी वेगळी चर्चा पुढे येत होती. मात्र, पंचायत समितीपाठोपाठ बाजार समितीची सत्ता काबीज करून, श्रीगोंद्याच्या राजकारणात ते आजही मजबूत स्थितीत असल्याचे दाखवून दिले. निवडीनंतर जगताप यांच्यासह ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, बाबासाहेब भोस, अण्णा शेलार, मनोहर पोटे, दीपक भोसले यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 

नाहाटा- भोसले यांची रणनीती 
पाचपुते गटाकडून डावपेच टाकले जात असताना, जगताप गटाची फिल्डींग मजबूत करण्याचे काम समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी केले. या दोघांनी त्यांचे संचालक जागीच ठेवून विरोधकांचा एक संचालक फोडत, जामदार व महांडुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

माजी आमदार राहुल जगताप यांनी या निवडीत सूत्रे हातात घेत, तालुक्‍याच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली. तालुक्‍यातील यापुढचे राजकारण जगताप यांच्यासोबतच करणार आहे. 
- संजय जामदार, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदे 
 

संपादन : अशोक मुरुमकर