esakal | मुस्लिम समाजाकडून सलोख्याचे दर्शन; वीरभद्र देवस्थानास अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दान
sakal

बोलून बातमी शोधा

Donation of silver crown from Muslim community in Rahata

राहाताचे ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरातून काही दिवसांपूर्वी चोरांनी चांदीचा मुकुट व अन्य आभूषणे लंपास केली होती. चोरी झालेले अलंकार परतही मिळाले.

मुस्लिम समाजाकडून सलोख्याचे दर्शन; वीरभद्र देवस्थानास अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दान

sakal_logo
By
सतिश वैजापूरकर

राहाता (अहमदनगर) : शहराचे ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरातून काही दिवसांपूर्वी चोरांनी चांदीचा मुकुट व अन्य आभूषणे लंपास केली होती. चोरी झालेले अलंकार परतही मिळाले. मात्र, शहरातील दानशूर भाविकांनी त्याहून दुप्पट किंमतीची चांदीची आभूषणे देवस्थानास देणगी स्वरूपात दिली. मुस्लिम समाजातील व्यापारी मंडळींनी पुढाकार घेत देवस्थानास अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दान करीत सामाजिक सलोखा दाखवून दिला. विधिवत पूजन करून हे अलंकार देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आले. 

काही दिवसांपूर्वी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लागण्यापूर्वीच शहरातील दानशूर भाविक सचिन भणगे, नीलेश धाडिवाल, राजेंद्र धाडगे, कपिल अग्रवाल, सचिन लुटे, सचिन कोल्हे व अमोल बनसोडे यांनी सव्वा किलो चांदीचा मुकुट देणगी स्वरूपात दिला. डॉ. स्वाधीन गाडेकर व प्रदीप पिपाडा यांनीही चांदीची आभूषणे दिली. त्यापाठोपाठ शहरातील फळव्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई शहा, इक्‍बाल शेख व असिफ शेख यांनी मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीसाठी अर्धा किलोचा चांदीचा मुकुट दिला. शिवाय, आभूषणे खरेदीसाठी अन्य भाविकांनी सुमारे तीन लाख 75 हजार रुपयांची देणगी देवस्थानाच्या स्वाधीन केली. 

वीरभद्र मंदिरात देणगी स्वरूपात आलेल्या आभूषणांची विधिवत पूजा करण्यात आली. देवस्थानाचे अध्यक्ष सागर सदाफळ, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड व पुजारी सर्जेराव भगत यांच्या उपस्थितीत ही आभूषणे देवस्थानाच्या स्वाधीन करण्यात आली. गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, भागुनाथ गाडेकर, ऍड. नारायण कार्ले, ऍड. रघुनाथ बोठे, बाळासाहेब सोनटक्के आदी उपस्थित होते. 


भाविकांकडून देवस्थानास सुमारे पावणेचार लाखांची देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली. त्यातून देवाच्या मूर्तीजवळील दोन खांबांना सुबक नक्षीकाम असलेल्या चांदीच्या पत्र्याने मढविण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. 
- सागर सदाफळ, अध्यक्ष, वीरभद्र देवस्थान ट्रस्ट 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image