डॉ. सुधीर गव्हाणे यांना प्रेरणादायी कुलगुरू पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार "गोल्डन एम ऍवॉर्ड फॉर एक्‍सलन्स अँड लीडरशिप इन एज्युकेशन' संस्थेद्वारे दर वर्षी दिला जातो. उच्चशिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक यांना लेखन, प्रभावी व्याख्यानाद्वारे प्रेरणा देण्याचे व नवनव्या कल्पना सातत्याने राबविण्याच्या लक्षणीय सकारात्मक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

नगर : महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील "प्रेरणादायी कुलगुरू' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या 20 ऑक्‍टोबर रोजी डिजिटल पुरस्कार वितरण होणार आहे. स्मृतिचिन्ह व मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार "गोल्डन एम ऍवॉर्ड फॉर एक्‍सलन्स अँड लीडरशिप इन एज्युकेशन' संस्थेद्वारे दर वर्षी दिला जातो. उच्चशिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक यांना लेखन, प्रभावी व्याख्यानाद्वारे प्रेरणा देण्याचे व नवनव्या कल्पना सातत्याने राबविण्याच्या लक्षणीय सकारात्मक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ उच्चशिक्षण कारकिर्दीत विविध विषयांतील नवनव्या अभ्यासक्रमांची आखणी, तसेच नव्या विभागांची स्थापना, ऍकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी शेकडो, तसेच विद्यार्थिवर्गासाठी दोन हजारांहून अधिक प्रेरक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर विविध विषयांना स्पर्श करणारे दोन हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियोजन व विकासात अनेक उपक्रम राबविले. महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम विद्यापीठात संशोधन प्रकाशन, करिअर काउन्सिलिंग मिशन आदींसह विविध प्रेरक उपक्रम राबविले. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, तसेच सर्व प्राचार्य, प्राध्यापक यांच्या सकारात्मक दृष्टीने व पाठबळाने हे कार्य करता आल्याचे डॉ. सुधीर गव्हाणे यांनी म्हटले आहे. 
 
संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Inspirational Vice Chancellor Award to Sudhir Gawhane