
जामखेड ः नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही जागा भाजपाने घेतल्या आहेत. एक जागा बिनविरोध घेतली तर दुसरी जिंकून मिळवली. त्यानंतर प्रथम खासदार विखे पाटील जामखेड दौऱ्यावर आले होते. बँकेच्या निवडणुकीत नेमके काय राजकारण झाले, याविषयी त्यांनी गौप्यस्फोट केला.
"जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जामखेडला आम्ही राष्ट्रवादीकडे माणूस ठेवला नव्हता. त्यामुळेच अमोल राळेभात सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध संचालक झाले. 'कर्जत'च्या निकालात 'पंचेचाळीस'वरून 'छत्तीस' कसे झाले? कोण फुटले, हे अजून त्यांना कळेना. पन्नास वर्षे आम्ही येथे काय 'भजी' खाल्ली काय? अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
तुमचं कुटुंब मोठं आहे, आमचंही कमी नाही
राज्याच्या जडणघडणीत तुमच्या कुटुंबाचे योगदानही मोठे आहे.
मात्र, आम्हीही नगर जिल्ह्यात काही तरी केले असेल का नाही? पंचेचाळीसचे छत्तीस झाले, हे काही एक दिवसाचे काम नाही. माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू असलेल्या कामाचे हे 'फलित' आहे.
आता भाजप-विखे गट एकत्र काम करील
माजी मंत्री राम शिंदेंनी कर्जतला निवडणूकीपूर्वी तीन दिवस तळ ठोकला होता; म्हणूच अंबादास पिसाळांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यापुढे भाजप आणि विखे गट एकत्रित काम करतील," असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.
शुक्रवारी (ता.12) रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात, जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, माजी सभापती सुधीर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, अॅड. प्रवीण सानप, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, लहू शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मी ही मार्गी लावली
खासदार विखे पाटील म्हणाले," राज्यातील सर्वाधिक निधी आणणारा खासदार अशी आपली ओळख आहे. जिल्ह्यात केंद्राच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी मंजूर करुन घेतला. यामध्ये नाव्हरा फाटा ते जामखेडकरिता चारशे पन्नास कोटी रुपये, नगर-सोलापूरसाठी दोन हजार कोटी रुपये, नगर-जामखेड करिता अडोतीस कोटी रुपये मंजूर करून आणले. नगरच्या फ्लाय ओहरचाही प्रश्न मार्गी लावला.ही काम आपल्या पाठपुराव्याने मंजूर झाली.
मंत्री गडकरीच सांगतील कोणी पाठपुरावा केला
कोणी एखादे पत्र देऊन आपल्यामुळे काम मंजूर झाले असे म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. ज्याने जे मंजूर केले ते त्याचेच 'श्रेय' आहे; हे स्वाभिमानाने मान्य केले पाहिजे. हा श्रेयवाद सोडविण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच उदघाटनासाठी आणून त्यांच्याकडून हे कोणाच्या पाठपुराव्याने मंजूर झाले. हे सांगायला लावू.
यावेळी काशीद, सुरवसे, राळेभात, यांची भाषणं झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.प्रवीण सानप यांनी केले.
पालिकेला मेरीटवर उमेदवारी देऊ
कर्जत-जामखेड नगरपालिका निवडणुकीत जनसंपर्क ज्याचा चांगला असेल. त्यालाच उमेदवारी मिळेल. कोणी कोणाच्या जवळचा म्हणून उमेदवारी मिळणार नाही. तसेच उमेदवारी जाहीर करताना उशीर केला जाणार नाही, असे माजी मंत्री राम शिंदे आणि आपल्यात ठरल्याचे खासदार विखेंनी सांगितले. दोन्ही नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या ताब्यात येतील. कार्यकर्त्यांनी मात्र दोन्ही बाजूने "मेवा खाऊ" नका. एकाच बाजूने रहा. पक्षाबरोबर रहा, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.