जोखीम पत्करून कोरोना रुग्णांची ने आण करणाऱ्या चालकांना पगार नाहीत

सतीश वैजापूरकर
Tuesday, 28 July 2020

भल्या सकाळी नाश्‍ता, दोन वेळा गरम जेवण, जोडीला दूध कॉफी अन्‌ चहा. निवासासाठी प्रशस्त व हवेशीर इमारत अशी उत्तम व्यवस्था साई संस्थानच्या कोवीड सेंटरमध्ये आहे.

शिर्डी (अहमदनगर) : भल्या सकाळी नाश्‍ता, दोन वेळा गरम जेवण, जोडीला दूध कॉफी अन्‌ चहा. निवासासाठी प्रशस्त व हवेशीर इमारत अशी उत्तम व्यवस्था साई संस्थानच्या कोवीड सेंटरमध्ये आहे. मात्र जोखीम पत्करून येथील रुग्णांची देखभाल करणाऱ्या सुमारे 200 कंत्राटी कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतन अद्यापही मागे घेण्यात आली नाही.

तर कोविड रुग्णांची ने आण करणाऱ्या सरकारी रूग्णवाहिकांच्या 13 चालकांना चार महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. केवळ 10 हजार रुपये मासिक वेतनावर काम करणाऱ्या चालकांना सध्यातरी कुणी वाली राहीलेला नाही. 

साई संस्थानचे क्वारंटाईन सेंटर व दोन्ही कोविड सेंटर मिळून सुमारे 200 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना सलग सात दिवस येथे काम करून पुढील सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. याचा अर्थ असा की ते सलग 15 दिवस त्यांच्या कुटूंबियांपासून दूर असतात. साई मंदिर व उत्पन्न बंद असल्याने मध्यंतरी साई संस्थानने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 40 टक्के कपात केली. मात्र त्यातून कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्या या कर्मचाऱ्यांना वगळायला हवे होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. त्यामुळे कमी वेतनावर जोखमीचे काम करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली. त्यात परिचारिका, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहीकांतून कोरोना रुग्णांची ने आण करणाऱ्या चालकांची अवस्था तर त्याहून अधिक बिकट आहे. त्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. मध्यंतरी त्यांना अधिकारी मंडळींनी महिनाभराचा किराणा मदत स्वरूपात दिला. त्यानंतर मात्र त्यांच्याकडे कुणाला पहायला वेळ मिळाला नाही. हे रुग्णवाहिका चालक ठेकेदारी पद्धतीने काम करतात. तुमच्या वेतनाचा पैसे मला मिळाले नाहीत. त्यामुळे वेतन अदा करता येत नाही. अशी भुमिका ठेकेदाराने घेतली आहे. सध्या हे चालक विनावेतन कोव्हीड रुग्णांची ने आण करण्याचे काम मुकाटपणे करत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drivers who take corona patients at risk are not paid