राहुरीत मद्यधुंद डंपरचालकाने दोघांना चिरडले

विलास कुलकर्णी
Sunday, 13 September 2020

घटनास्थळी गर्दी जमली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत दिसला. त्यामुळे गर्दीतील लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. लोकांनी डंपर चालकाला जागेवरच चोप दिला.

राहुरी : गोटुंबे आखाडा येथे आज (रविवारी) सकाळी साडेदहा वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर भरधाव वेगाने चाललेल्या डंपरने समोर चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहून, स्थानिक ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला. डंपर चालकाला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. 

शरद रावसाहेब कणगरे (वय ३६) व अनिल मधुकर पंडित (वय ४५, दोघेही रा. उंबरे, माळेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ते दुचाकीवरुन (एमएच १७ सीजे ६९०८) उंबरेच्या दिशेने चालले होते. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराच्या खडी वाहतुकीच्या डंपरने (एमएच १६ सीसी ३१३३) भरधाव वेगाने समोर चाललेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. 

घटनास्थळी गर्दी जमली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत दिसला. त्यामुळे गर्दीतील लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. लोकांनी डंपर चालकाला जागेवरच चोप दिला. राहुरी पोलीस ठाण्यात डंपर आणल्यावर चालकाची राहुरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अर्धवट झालेली कामे, खडीचे ढीग दिसत नसल्याने, त्यावर आदळून वारंवार अपघात होत आहेत. मागील वर्षभरात उंबरे व ब्राह्मणी परिसरातील पाच जणांनी या रस्त्यावर जीव गमावला आहे.  
आज अपघातात ठार झालेले दोघेही मोलमजुरी करणारे होते. मृत शरद कणगरे यांच्यामागे पत्नी, आई, वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मृत अनिल पंडित यांच्या मागे पत्नी व सहा मुली असा परिवार आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The drunken dumper driver crushed the two