उबदार कपड्यांची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर ग्राहकांनी खरेदीसाठी झालेली गर्दी

आनंद गायकवाड
Monday, 30 November 2020

दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीची चाहुल लागल्याने, शहरातील बसस्थानकापासून अकोले बाह्यवळण रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर थंडीसाठी उबदार कपडे विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत.

संगमनेर (अहमदनगर) : दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीची चाहुल लागल्याने, शहरातील बसस्थानकापासून अकोले बाह्यवळण रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर थंडीसाठी उबदार कपडे विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत. 

दरवर्षी ऑक्‍टोबरच्या मध्यावरच संगमनेरातील बसस्थानकाजवळून अकोले बाह्यवळण रस्त्याला मिळणाऱ्या मार्गाच्याकडेला सजलेल्या तिबेटी नागरिकांच्या, रंगीबेरंगी विविध प्रकारच्या उबदार कपड्यांच्या दुकानांमुळे संगमनेरकरांना दरवर्षी थंडीची चाहुल लागते. अनेक वर्षांपासून संगमनेर शहरात थंडीचा मोसम सुरु होण्यापूर्वीच त्यांची तात्पुरती दुकाने सजतात. अनेक नागरिक व खेड्यापाड्यातील ग्रामस्थांचे भावात घासाघीस करुन, नंतर खरेदी करण्याचे हे आवडते मार्केट आहे.

अनेक वर्षांच्या या परंपरेत या वर्षी खंड पडला असून, जगभरातील कोवीड प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर या वर्षी तिबेटी विक्रेते संगमनेरकडे फिरकलेच नाहीत. अन्यथा संगमनेरात तात्पुरत्या स्वरुपात भाडोत्री खोल्या घेवून सहकुटूंब निवास करणाऱ्या या विदेशी नागरिकांनी चांगल्या प्रकारे मराठी भाषाही अवगत केली होती. नेपाळी, तिबेटी ढंगाच्या मराठीत त्यांचा ग्राहकांशी भावाची घासाघीस करताना चाललेला संवाद अनेकदा हशा निर्माण करीत असे. यावर्षी त्यांची जागा स्थानिक विक्रेत्यांनी घेतली आहे. 20 ते 22 दुकाने या ठिकाणी सजली आहेत. 

लहान मुलांचे कपडे, स्त्री व पुरुषांसाठी विविधरंगी स्वेटर, मफलर, कानटोप्या, स्कार्फ, हातमोजे, पायमोजे, युवा पिढीला आकर्षित करणारे वुलन, रेक्‍झीन व लेदरचे विविध आकार प्रकारचे जर्किन यांनी दुकाने सजली आहेत. एकापेक्षा अनेक प्रकारचे उबदार कपडे, ब्लॅंकेट विक्रीला घेवून येणारे, तिबेटी असूनही स्थानिकांच्या भाषेत नेपाळी दुकानदार यावर्षी आले नसल्याने त्यांची अनुपस्थिती संगमनेरकरांना चांगलीच जाणवत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the cold the number of shops selling sweaters increased in Sangamner taluka