मालकीच्या वाहनांसाठी कृषी विभाग मारतोय पोलिस ठाण्यात हेलपाटे

संजय आ. काटे
Saturday, 29 August 2020

कोरोना संकट आले आणि कृषी विभागाचे सरकारी वाहन अधिग्रहण केल्याने ताब्यातून गेले. जवळपास सहा महिन्यापासुन तालुका कृषी विभागाचे सरकारी वाहन पोलिस निरीक्षकांच्या कस्टडीत पडून आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : कोरोना संकट आले आणि कृषी विभागाचे सरकारी वाहन अधिग्रहण केल्याने ताब्यातून गेले. जवळपास सहा महिन्यापासुन तालुका कृषी विभागाचे सरकारी वाहन पोलिस निरीक्षकांच्या कस्टडीत पडून आहे. ते वाहन परत मिळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतोय मात्र हे वाहन पोलिस सोडत नाहीत. 

कोरोनाच्या नावाखाली अधिग्रहित केलेले वाहन काही महिन्यांपासून एकाच जागी उभे आहे. पोलिसांच्या ताब्यात एकाच ठिकाणी धुळखात गंजत पडले आहे. या वाहनाचे टायर बदलण्यात आले असुन, बॅटरी चार्जिंग उतरल्यामुळे गायब झाल्या आहेत. आतील आसन व्यवस्था देखील तुटली आहे. 

या दरम्यान महत्त्वपूर्ण असा खरीप हंगामाचा होता. या कालावधीत 58 बियाणे तक्रारी- चौकशी, खत विक्री केंद्र- तपासणी, युरिया तक्रारी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नैसर्गिक आपत्ती, पिक विमा करिताचे पिक कापणी प्रयोग, ठिबक सिंचन संच तपासणी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड अमंलबजावणी, खरीप हंगामातील किड व रोग यांच्या पाहणी ईत्यादी महत्त्वाची कामे असुन देखील हे तालुका कृषी अधिकारी यांचे वाहन अजुनही पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात आहे. 

वाहन नसल्याने या विविध कामाची प्रभावी पणे अमंलबजावणी करण्यात कृषी विभागास प्रंचड मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

तालुका कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के म्हणाले, वाहन ताब्यात मिळावे यासाठी वरिष्ठांना दोन वेळा लेखी पत्र व्यवहार केला. तहसीलदार, पोलिस अधीक्षक यांना देखील पत्र पाठवून वाहन परत मिळण्यासाठी विनंती केली आहे. संबधीत वाहन हे आवश्यकता नसताना देखील गेले दोन महीने वापराशिवाय पोलिस स्टेशनला तसेच भिजत पडुन आहे. मात्र कृषी विभागाला ते परत देण्याची तत्परता पोलिस प्रशासन दाखवु शकलेले नाहीत.

म्हस्के यांनी पुढे सांगितले की, सदरील वाहन दुरुस्ती करता कोणतीही तरतूद कृषी विभागाकडे नाही. संबधित वाहनाची दुरावस्था श्रीगोंदे पोलिसांकडून झाल्याने त्यांनीच सदरील वाहन दुरुस्त करुन सुस्थितीत परत करावे.

पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, कृषी विभागाचे हे वाहन आमच्या ताब्यात असले तरी त्याची दुरावस्था आम्ही केलेली नाही. कोरोनाच्या अतिरिक्त कामासाठी तहसीलदारांनी दुसरे वाहन उपलब्ध करून घ्यावे. हे वाहन सोडण्याचे पत्र त्यांनी दिले तरी वाहन सोडून देऊ.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the corona the government vehicle of Shrigonda agriculture department was taken into police