esakal | खळखळणारे ओढे- नाले, बहरलेल्या वृक्षवेलींमुळे निसर्ग सौंदर्य खुलले
sakal

बोलून बातमी शोधा

Due to heavy rains the mountain ranges in Shevgaon taluka became green

भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी, गोळेगाव परिसरातील डोंगररांगा जोरदार पावसामुळे हिरवाईने नटल्या असून, त्यातून वाहणारे धबधबे, तुडुंब भरलेले तलाव, खळखळणारे ओढे- नाले, बहरलेल्या वृक्षवेलींमुळे परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.

खळखळणारे ओढे- नाले, बहरलेल्या वृक्षवेलींमुळे निसर्ग सौंदर्य खुलले

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्‍याच्या पूर्व भागातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी, गोळेगाव परिसरातील डोंगररांगा जोरदार पावसामुळे हिरवाईने नटल्या असून, त्यातून वाहणारे धबधबे, तुडुंब भरलेले तलाव, खळखळणारे ओढे- नाले, बहरलेल्या वृक्षवेलींमुळे परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.

कोरोनामुळे बंद असलेल्या पावसाळी पर्यटनाला या भागातील दुर्लक्षित निसर्गसौंदर्याने साद घातली असून, तालुक्‍यातील निसर्गप्रेमींची पावले तिकडे आपसूकच वळू लागली आहेत. 

तालुक्‍याचा पूर्व भाग हा तसा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या परिसरातील पूर्व- पश्‍चिम पसरलेल्या गर्भगिरीच्या डोंगररांगेत भगवानगड, काशिकेदारेश्वर, हरिहरेश्वर ही निसर्गसंपन्न धार्मिक स्थळे वसलेली आहेत. महर्षी वाल्मीकी, काशिनाथबाबा, भीमसिंह महाराज यांच्या तपश्‍चर्येने व रामायणकालीन प्रभू राम- सीता यांच्या वास्तव्याने या परिसराला धार्मिक व पौराणिक महत्त्व लाभले आहे. काशिकेदारेश्वर परिसर पुरातन काळात विविध निसर्गसंपन्न वनौषधी व डोंगरदऱ्यांनी व्यापल्यामुळे त्यास दंडकारण्य असेही संबोधले जाते. 

विविध आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या हिरडा, बेहडा, अर्जुनसादडा, गुळवेल, चंदन, गुंज अशा अनेक वनऔषधी वनस्पती येथे आढळतात. या ठिकाणी प्राचीन असे स्वयंभू शिवलिंग असून, श्रावण महिन्यामध्ये सोमवारी दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी होते. यंदा जोरदार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरव्यागार वनराईने व्यापला आहे. ओढे- नाले खळखळून वाहत आहेत. डोंगरांतून जागोजागी कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे येणारा-जाणारांच्या मनाला भुरळ घालतात. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनास बंदी असली, तरी तालुक्‍यातील अनेकांना हुबेहूब सह्याद्रीतील पावसाळी भटकंतीची आठवण करून देणारा हा परिसर खुणावू लागला आहे. दर्शनासाठी मंदिर सध्या बंद असले, तरी परिसरातील बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे, अधोडी, राणेगाव, शिंगोरी, बालमटाकळीसह तालुक्‍यातील ग्रामस्थांची दर्शनासाठी व निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी संख्या वाढत आहे. 

प्राचीन, धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला हा परिसर मात्र अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, विकासापासून कोसो दूर आहे. अनेक अडचणींवर मात करत या परिसराला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्व क्षेत्रांतील व्यक्तींचे सहकार्य आवश्‍यक आहे. 
- बाबा गिरी महाराज, श्री क्षेत्र काशिकेदारेश्वर संस्थानप्रमुख 

संपादन : अशोक मुरुमकर