मंत्री शंकरराव गडाखांमुळे मिळाला नेवासे तालुक्याला इतका कोटीचा पीकविमा

सुनील गर्जे
Sunday, 16 August 2020

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासे तालुक्यासाठी चार कोटी १७ लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. याचा तालुक्यातील तब्बल १० हजार शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

नेवासे (अहमदनगर) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासे तालुक्यासाठी चार कोटी १७ लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. याचा तालुक्यातील तब्बल १० हजार शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

रब्बी हंगाम २०१८-१९ मधील ज्वारीसाठी दोन हजार ९०९ शेतकऱ्यांना दोन कोटी सहा लाखाचा, हरभरासाठी पूर्वीचे मंजूर सर्कलमधील वंचीत सहा हजार ६६७ शेतकऱ्यांना एक कोटी ८५ लाखाचा तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३२२ शेतकऱ्यांना २५ लाख ७४ हजाराचा मिळून १० हजार शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी १७ लाखाचा पीकविमा मंजूर झाला आहे. विम्याची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मंत्री शंकरराव गडाख यांच्या संपर्क कार्यालयातुन देण्यात आली.

विमा कंपन्याकडे विमा हप्त्याची रक्कम भरूनही नेवासे तालुक्यातील शेतकरी ज्वारी, हरभरा व भुईमूग पीक विम्याचे लाभापासून वंचीत होते. परंतु मंत्री गडाख यांनी संबंधित पिकविमा कंपन्याकडे शासनामार्फत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मोठे आले आहे.

तालुक्यातील ज्वारीचे २०८३ हेक्टर क्षेत्राला (२ हजार ९५८ शेतकरी) प्रती हेक्टरी ९ हजार ८८३ रुपये प्रमाणे २ कोटी ६ लाख, हरभरा पिकास पूर्वीचे मंजूर सर्कलमधील एकुण ६ हजार ६६७ हजार शेतकऱ्यांचे ४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राला प्रती हेक्टरी ४ हजार १०३ रुपयांप्रमाणे १ कोटी ८५ लाख तर भुईमूग पिकास १६८ हेक्टर क्षेत्राला प्रती हेक्टरी १५ हजार ३२२ प्रमाणे सुमारे २६ लाख रुपये मिळणार आहेत.

मंत्री गडाखांचे शेतकऱ्यांकडून आभार 
यावर्षी कोरोना संकटामुळे शेतमालाला उठाव व मागणी अभावी योग्य दर मिळत नसल्याने पाऊसमान चांगले होऊनही शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यात आता मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून मिळणार असणारी पिकविम्याची रक्कम पिकविमाधारक शेतक-यांसाठी मोठी दिलासादायक ठरणार आहे. शेतीकामासाठी ऐन गरजेच्या वेळी ही रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी मंत्री गडाखांचे आभार मानले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Minister Shankarrao Gadakha Newase taluka got crop insurance of so many crores