तुरीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नीलेश दिवटे
Wednesday, 7 October 2020

सध्या तालुक्यातील काही गावे अपवाद सोडल्यास दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी अशा तीन टप्प्यात जोरदार पाऊस पडत आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला असून नियमितपणे दररोज हजेरी लावत आहे. या सततधार पावसामुळे हलक्या सह मध्यम जमिनीवर पाणी साचू लागल्याने तूर, कपाशी सह इतर पिके धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी पिकांना कोंब आले असून काही ठिकाणी पाने पिवळी पडू लागली आहेत. मात्र यामुळे शेतकरी वर्गात मोठी भिती निर्माण झाली आहे.

सध्या तालुक्यातील काही गावे अपवाद सोडल्यास दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी अशा तीन टप्प्यात जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यात सुरुवातीला पाऊस पडत नसून परतीचा पाऊस चांगला होतो असे मागील आकडेवारी सांगते. मात्र यावर्षी सुरुवातीलाच पाऊस चांगला पडला असून सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाने मागील दहा वर्षाच्या विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक गावात ढगाळ वातावरणामुळे सूर्याचे दर्शन होत नसून पिकाच्या वाढीला सूर्यप्रकाश आवश्यक असल्याने काही ठिकाणी वाढ खुंटल्याचे चित्र दिसत आहे.
 
यंदा पाऊस चांगला असल्याने पिके जोमात आहेत. परंतु जोरदार पावसाने तुरीच्या पिकाबरोबर कांदा आणि कपाशी या पिकांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाईल, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले झाले आहेत. या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

जळगांव चौफुलाचे सरपंच भैरवनाथ शेटे म्हणाले, माहिजळगाव आणि परिसरामध्ये सततधार पावसाने शेतात पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे तुरीसह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला पिकाची नुकसान भरपाई द्यावी.  

महिजळगावचे शेतकरी बाळासाहेब जाधव म्हणाले, यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस आल्याने समाधान वाटले. मात्र नंतर सततच्या पावसाने मात्र तोंडचे पाणी पळविले आहे. सध्या सर्व पीक अत्यंत चांगले असून सखल भागात पाणी साचत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेण्याच्या बेतात आहे. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to rains in karjat the crop has gone under water causing huge losses to farmers