संक्रांतीनिमित्त नेवाशाच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी

सुनील गर्जे
Wednesday, 13 January 2021

भोगीला देवतांना मिश्रभाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. मकर संक्रांतीला सुवासिनी पूजन करतात.

नेवासे : "तीळ-गुळ घ्या, गोड गोड बोला'चा संदेश देऊन मनामनात गोडवा निर्माण करणाऱ्या नवीन वर्षातील पहिल्या सणासाठी, मकर संक्रांतीसाठी बाजारपेठ गेल्या तीन-चार दिवसांपासून सज्ज झाली आहे. 

कोरोनाच्या भीतीमुळे गेल्या 10 महिन्यांनंतर साजरा होणारा नव्या वर्षातील हा पहिलाच सण असेल. थंडीची दुलई बाजूला सारून उन्हाळ्याची चाहूल देणारा मकर संक्रांतीचा सण दोन दिवस साजरा होतो.

भोगीला देवतांना मिश्रभाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. मकर संक्रांतीला सुवासिनी पूजन करतात. पुरणपोळी वा शेंगदाण्याच्या पोळीसह पंचपक्‍वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी ज्येष्ठांकडून तिळगुळ वाटप होते. 

यंदा बुधवारी (ता.13) भोगी व गुरुवारी (ता.14) मकर संक्रांत आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत बोरं, गाजरं, ऊस, तिळगुळ, भुईमूगाचा शेंगा, सुगड खरेदीसाठी गर्दी होत आहे. तीळगुळाच्या वड्यांसह लाडूंना मोठी मागणी असल्याचे किराणा व्यापारी किशोर भंडारी यांनी सांगितले. नेवासे शहरासह कुकाणे, घोडेगाव, सोनई, प्रवरा संगम, भानसहिवरे, वडाळा बहिरोबा, चांदा, नेवासे फाटा येथील बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. 

वाणाच्या साहित्याला प्राधान्य 
वाण खरेदीसाठीही महिला बाजारात गर्दी करीत असून, संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. त्यात विशेषत: छोट्या वस्तूंना अधिक प्राधान्य असते. त्यात चमचे, कुंकवाचा करंडा, बांगड्या, साबण बॉक्‍स, टिकल्यांची पाकिटे व इतर उपयोगी साहित्यांची महिला आवडीने खरेदी करतात, असे कुकाणे येथील व्यावसायिक भिमराज विधाटे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Sankranti, there was a crowd in Nevasa market