महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच नाही; भाजपच्या माजी आमदार कोल्हे यांची टिका

मनोज जोशी
Friday, 1 January 2021

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यात मुली व महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून आरोपी मोकाट फिरत आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यात मुली व महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून आरोपी मोकाट फिरत आहे.

त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकींना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

नुकतीच पेण येथील आदिवासी समाजातील अडीच वर्षाच्या बालिकेची बलात्कार करुन हत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा जाहीर निषेध करून मन सुन्न करणारी घटना अतिशय निंदनीय असल्याचे कोल्हे म्हणाल्या.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्या पुढे म्हणाल्या, वारंवार सदरच्या घटना घडत असून हा गुन्हा करणारी व्यक्ती एकच नव्हे तर दुसऱ्यांदा असा गुन्हा करतो म्हणजे राज्यात कायदयाचा धाक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. भविष्यात असे प्रसंग करण्याचे धाडस होणार नाही. यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलावीत. तरच खऱ्या अर्थाने शाहु, फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा चालवीत आहोत, असे म्हणता येईल. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना महिला कुठेही सुरक्षित राहिली नाही.

गाव आणि जिल्हा पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेळावे आणि शिबीर आयोजित करून जनजागृती केली जात असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. 

महिलांवरील अत्याचार, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे अशा घटनामध्ये गेल्या काही दिवसात वाढ होतांना दिसत आहे असे ही त्या शेवटी म्हणाल्या.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the Mahavikas Aghadi government the accused were intimidated by the police