esakal | अॉक्सीजन वाटपाचं ठरलं, प्रत्येकाला मिळणार १० सिलिंडर

बोलून बातमी शोधा

oxygen
अॉक्सीजन वाटपाचं ठरलं, प्रत्येकाला मिळणार १० सिलिंडर
sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर ः ""कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची मागणी वाढली आहे. रुग्णालयांकडून ऑक्‍सिजन बेडची माहिती मागविली जाणार आहे. नायब तहसीलदार आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक प्रतिनिधी, अशा दोघांची रिफिलिंग सेंटरवर देखरेखीसाठी नियुक्ती केली जाणार आहे. सर्व रुग्णालयांना यापुढे सम प्रमाणात ऑक्‍सिजन सिलिंडर दिले जातील,'' अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (ता. 28) सात रुग्णांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेतली. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. महेश वीर, डॉ. सतीश फाटके आदींसह पदाधिकारी- सदस्य उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयांत मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. ऑक्‍सिजन रिफिलिंग सेंटरवर ऑक्‍सिजन घेण्यासाठी मोठी गर्दी असते. काही रुग्णांचे नातेवाईकही तेथे ऑक्‍सिजन खरेदीसाठी रांगेत उभे असतात. त्यामुळे खासगी रुग्णालयांना ऑक्‍सिजन मिळविण्यात अडचणीत येत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या खासगी रुग्णालयांना प्राधान्याने ऑक्‍सिजन द्यावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

शहरातील ज्या खासगी रुग्णालयात सात रुग्णांचा आकस्मिक मृत्यू झाला, त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने ऑक्‍सिजन रिफिलिंग सेंटरवर वितरणात असलेल्या त्रुटींचा पाढा वाचला. एमआयडीसीत तीन रिफिलिंग सेंटर आहेत. ऑक्‍सिजन घेण्यासाठी आलेल्या व्यक्‍तीकडे असलेले सिलिंडर भरल्यानंतरच रांगेतील मागच्याचे सिलिंडर भरण्यास सुरवात केली जाते. त्यामुळे या सेंटरवर ऑक्‍सिजन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या व्यक्‍तींना बारा-पंधरा तास थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाला जास्तीत जास्त दहा सिलिंडर भरून द्यावेत. यामुळे एका दिवसात सगळ्यांना सम प्रमाणात ऑक्‍सिजन मिळेल, अशी व्यथा या वेळी मांडण्यात आली.

हेही वाचा: चीनच्या मदतीने विखे पाटील उभारणार अॉक्सीजन प्लँट

जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली. आगामी काळात याच पद्धतीने ऑक्‍सिजनचे वितरण करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले. प्रत्येक रिफिलिंग सेंटरवर नायब तहसीलदार 24 तास कार्यरत राहणार आहेत. आयएमएचा एक प्रतिनिधी समन्वयासाठी कार्यरत राहणार आहे.

खासगी रुग्णालयाने ऑक्‍सिजन संपण्याअगोदर एक दिवस ऑक्‍सिजन घेण्यासाठी या केंद्रावर यावे. रुग्णालय व्यवस्थापनाने त्यासाठी व्यवस्थापनातील व्यक्‍तीची नियुक्‍ती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

गुजरातचा ऑक्‍सिजन नगरला

जिल्हा प्रशासन ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. चाकण (जि. पुणे), तळोजा (रायगड) एमआयडीसीतून ऑक्‍सिजन आणला आहे. विशाखापट्टणमहून रेल्वेने आणलेल्या ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेसमधूनही दोन टॅंकर जिल्ह्याला मिळाले आहेत. गुजरातमधील जामनगर येथून 24 केएल क्षमतेचा एक टॅंकर मिळाला आहे. तोही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

  • नायब तहसीलदार, आयएमएचा प्रतिनिधी ठेवणार लक्ष

  • एक दिवस अगोदर नोंदवावी लागणार मागणी

  • रुग्णालयास प्रतिनिधी करावा लागेल नियुक्त