शिळी बिर्याणी खाल्ल्याने भावंडांचा मृत्यू, धक्क्याने मामा-आजीही रूग्णालयात

सुहास वैद्य
Sunday, 25 October 2020

दोन भाच्याचा दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयातच पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोल्हार : अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे पाथरे बुद्रुक (ता. राहाता) येथील दोन सख्या बहिण भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. दोन्ही भावंडे पाच व चार वर्षांचे आहेत. या चिमुकल्यांचे मामा व आजी यांच्यावर लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या बाबत हकीकत अशी , पाथरेतील मुलांनी गल्लीत वसिम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. ते आठवडे बाजारात भाजीपाला 
विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. वसिम यांचा मुलगा अरहान (वय 5 वर्षे ) व मुलगी आयेशा (वय 4 वर्षे) असून वसिम यांची पाथरे नजीक हणुमंतगांव (कोंबडवाडी) येथे सासुरवाडी आहे. 

दोन्ही मुले अरहान व आयेशा यांचे नेहमी मामा शाविद आजिज शेख यांचे घरी येणे-जाणे होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासुनही नेहमीप्रमाणे अरहान व आयेशा मामा शाविद यांच्या घरी गेले असता दरम्यानच्या काळात मामा शाविद व सदर भाचा भाचीसह शाविदचे कुटुंबीय यांना दोन दिवसांपासून शारिरीक अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांनी सोनगांव सात्रळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली. 

रविवारी सकाळी 9 च्या दरम्यान अरहान व आयेशा,मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईकानी त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुलगा अरहान यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले.त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मुलगी आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन भाच्याचा दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयातच पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आजी शबाना ही रुग्णालयात उपचार घेत आहे. लोणी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

 

दोन्ही भावंडांनी त्यांच्या मामाकडे शिळी बिर्याणी खाल्ली त्यातून त्यांना विषबाधा झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

- डॉ. संजय घोलप,मुख्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हार, अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By eating biryani Death of two children