शहरी भागातील प्रवाशांनीच एसटीला तारले

दौलत झावरे
Friday, 15 January 2021

सुमारे एक लाख 49 हजार 400 किलोमीटर धावल्यावर एसटीला सुमारे 40 लाखांचे उत्पन्न मिळते. त्यात लांब पल्ल्याच्या बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नगर ः कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे चाक तोट्यात रुतले आहे. त्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

शहरी भागाबरोबरच लांब पल्ल्याच्या बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी ग्रामीण भागातून अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एसटी अद्यापही तोट्यातच आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या तोट्यात मोठी भर पडत गेली. ती अद्यापही कायम आहे. तोटा भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध उपक्रम राबवून प्रवाशांना आकर्षित करण्यात येत आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या धास्तीमुळे पूर्वीप्रमाणे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.

एसटीच्या नगर विभागाच्या अनेक बस 50 टक्के भारमानावरच रस्त्यावर धावत आहेत. नगर विभागातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेर एकूण 450 बसच्या माध्यमातून रोज 1192 फेऱ्या होतात.

सुमारे एक लाख 49 हजार 400 किलोमीटर धावल्यावर एसटीला सुमारे 40 लाखांचे उत्पन्न मिळते. त्यात लांब पल्ल्याच्या बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात जाणाऱ्या बसना प्रवाशांची गर्दी दिसून येते.

प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाने ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने, एसटीच्या तोट्यात भर पडत आहे. 

 
पर्यटनासह देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने "पॅकेज टूर' योजना सुरू केली आहे. याचा पर्यटकांनी व भाविकांनी लाभ घ्यावा. 
- विजय गिते, विभाग नियंत्रक, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economic benefits to ST due to commuters in urban areas