शिक्षक व शिक्षणदूत यांच्या समन्वयातून तुफानवस्ती शाळेचा ‘वस्ती तेथे शिक्षण’ उपक्रम 

केशव चेमटे
Friday, 23 October 2020

सध्या कोरानाच्या संकटामुळे शाळाबंद आहेत. ग्रामीण भागातील बर्‍याच पालकांकडे स्माटे फोन नाहीत.

भाळवणी (अहमदनगर) : सध्या कोरानाच्या संकटामुळे शाळाबंद आहेत. ग्रामीण भागातील बर्‍याच पालकांकडे स्माटे फोन नाहीत, नेटवर्क व विजेच्या लपंडावामुळे मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून पारनेर तालुक्यातील जि. प. धोत्रे खुर्द व तुफानवस्ती येथील शिक्षक सचिन ठाणगे, एकनाथ कोरडे, सौ.प्रतिम गलांडे, चारुशिला रायकर यांच्या संकल्पनेतून ‘वस्ती तेथे शिक्षण’हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला. 
कोव्हीड 19 या साथीच्या काळात शाळाबंद आहेत मात्र शिक्षण सुरु आहे. 

अनेक शाळांमध्ये ऑनलाईन अभ्यास रोज दिला जातो , त्याचा फायदाही मुलांना होतो.कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक सत्राचा पहिला टप्पा पुर्ण होत आला असला तरी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्ययन सुरु होवू शकले नाही. त्यामुळे पालक शिक्षण तसेच विद्यार्थीही चिंतेत आहेत. ऑनलाईन अध्ययनाचा मुलांना फायदा होतोय परंतू ग्रामीण भागामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले मोबाईलच्या आहारी जाण्याबरेाबरच त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
धोत्रे खुर्द व तुफानवस्ती येथील पालक हे 100 टक्के आदिवासी समाजातील असून मोलमजूरी व मेढपाळ व्यवसाय करतात. त्यांच्याकडे स्मार्टफोन उपलबध्य नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून येथील शिक्षकांनी ऑफलाईन शिक्षणाचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. 

शाळेतील व्यवस्थापन समिती, सरपंच व शिक्षक यांच्या मदतीने वस्त्यांवरील विद्यार्थ्यां व वस्तीवरील शिक्षित महिलांना आवाहन करण्यात आले, आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून मनिषा मंचरे, सुनिता नाईकवाडी, रिंकू सासवडे, राजश्री तागड, लिला तागड, पुनम मधे, मुक्ता बर्डे, धनेश कोळेकर, गणेश पावर यांनी कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करण्यास स्वयंस्पूर्तीने पुढे आले. त्यांना मास्क, सॅनिटयझर खडू व फळे इ. साहित्य शिक्षकांनी पुरवले. शैक्षणिक शिक्षणदूत नावाचा व्हॉटस्अ‍ॅप् ग्रुप तयार करुन त्यांना दररोज कोणता अभ्यास द्यायचा याचे नियोजन शिक्षकांनी दिले. त्याप्रमाणे ते शिक्षणदूत आपल्या वस्तीवरील घराजवळील मुलांना सोशल डिस्टंशिंगच्या सर्व नियामचे पालन करुन अभ्यास पूर्ण करुन घेतात.

दर रविवारी मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून ‘संडे इज फंडे’ या नावाने वेगवेगळे खेळ, मनोरंजनात्मक गोष्टी, विविध ऐतिहासिक चित्रपट इ. च्या माध्यामातून रविवार साजरा केला जातो. आतापर्यंत या महिलांनी प्रथमसत्रचा अभ्यास, जि.प.ने पुरविलेल्या स्वाध्यायपुस्तिका, चौरे पॅटर्न चा अभ्यास शिक्षकांच्या मार्गदर्शन व मदतीने पुर्ण केला आहे. 

कोरोनासारख्या महाभयंकर संकटात देश आपल्यासाठी काय करतो या पेक्षा आपण देशासाठी काय करता येईल या भावनेतून या ग्रामीण भागातील महिलांनी शिक्षणदूताच्या माध्यमातून शाळा बदं पण शिक्षण मात्र चालू ठेवले. शिक्षक, शिक्षणदूत व ग्रामस्थ यांच्या समन्वयामूधन गेल्या तीन महिन्यापासून ‘वस्ती तेथे शिक्षण’ विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जात असल्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.शिवाय बर्‍याच प्रमाणात मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यास मदत झाली आहे. 

या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, विस्तार अधिकारी गेणू नरसाळे, केंद्र प्रमुख निरा इधाटे, सरपंच बाबासाहेब सासवडे व परिसरातील पालकांनी कौतुक केले आहे.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education activities there in the storm settlement in Bhalwani