
महापालिकेची संकलित कर थकबाकी मोठी आहे. मागील थकबाकीसह चालू संकलित करवसुलीसाठी विशेष प्रयत्न करावेत.
नगर : जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज महापालिकेत विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत कामकाजाचे नियोजन केले.
प्रत्येक विभाग पुढील महिनाभरात काय कामकाज करणार, याचा अहवाल सादर करण्याची सूचना केली. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी मार्केट विभागाला नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली.
महापालिकेची संकलित कर थकबाकी मोठी आहे. मागील थकबाकीसह चालू संकलित करवसुलीसाठी विशेष प्रयत्न करावेत. वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई करावी. शहरातील अतिक्रमणांबाबत प्रभाग समितीनिहाय नियोजन करावे.
अमृत पाणी योजना व भूयारी गटार योजेनेच्या कामाला गती देऊन ते जलदगतीने पूर्ण करावे, दैनंदिन स्वच्छता, आरोग्यसेवा, दिवाबत्ती, घनकचरा संकलन, अंत्यविधी सुविधांचा आढावा घेत मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी केल्या. महापालिका अधिनियमांतून अधिकाऱ्यांनी दरारा निर्माण करावा, आपल्या कामातून छाप निर्माण करावे, असे ते म्हणाले.
उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, संतोष लांडगे, सहायक आयुक्त सचिन राऊत, दिनेश सिनारे, डॉ. नरसिंह पैठणकर, प्रवीण मानकर, सुरेश इथापे, कल्याण बल्लाळ, रोहिदास सातपुते, शहाजहान तडवी, मेहेर लहारे, अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळचा रस्ता करा
जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. या भागात रस्तेखोदाई झाल्याने रहदारीस अडथळा येतो. या भागातील रस्तेदुरुस्ती करावी व आठवडयात अतिक्रमणे काढण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.