शाश्वत शेतीसाठी राजेंद्र पवार प्रयत्नशील; शेतकऱ्यांसाठी 'अंजीर पीक' अभ्यास दौरा

Efforts have been initiated to encourage the cultivation of fig orchards in Jamkhed..jpg
Efforts have been initiated to encourage the cultivation of fig orchards in Jamkhed..jpg

जामखेड (अहमदनगर) : येथील शेती व शेतकरी बदलावा. शेतीची शाश्वत व्हावी. पारंपरिक पीक पध्दतीला फाटा देवून आधुनिक पध्दतीचा स्विकार व्हावा. याकरिता आमदार रोहित पवार यांचे पिताश्री राजेंद्र पवार प्रयत्नशील आहेत. त्यांनी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार रोहित पवारांनी या मतदारसंघाचे नेतृत्व स्विकारल्यापासून येथील शेतीची उत्पादकता वाढावी, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा याकरिता निरनिराळ्या प्रात्यक्षिक, शेतकरी सहल, आदर्श शेतकरी भेटीच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग राबविले आहेत. कांदा, मोसंबी, संत्रा पाठोपाठ आता 'अंजीर' च्या फळबागेच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रयत्न सुरु केले आहेत.

प्रयोगशील शेतकरी तथा उद्योजक समीर डोंबेंच्या भेटीसाठी (खोर ता. दौंड जि.पुणे) गाठले. त्यांची यशोगाथा समजावून घेतली. अन् व्यवस्थापनाचे 'धडे' गिरवले. अंजीर लागवडीतील बारकावे जाणून घेतले. त्यांच्या समवेत स्वतः राजेंद्र पवार हे देखील होते. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, कर्जत –जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून व राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'अंजीर पिक' शेतकरी अभ्यास दौरा झाला. 

यापूर्वी लिंबू -संत्रा संशोधन केंद्र नागपूर, कांदा लसूण संशोधन केंद्र, मंचर जि.पुणे येथे शेतकरी दौरे झाले होते. यावेळी अंजीर या फळपीकाच्या अभ्यासासाठीचा दौरा दौंड तालुक्यातील खोर येथे अयोजित केला होता. यामध्ये जामखेड तालुक्यातील राजुरी, बांधखडक, सोनेगाव, सरदवाडी तर कर्जत तालुक्यातील थेरवडी, माहीजळगाव येथील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मु.पो. खोर ता.दौंड जि.पुणे  येथील समीर डोंबे यांच्या 'पुना फिग' यांनी उभ्या केलेल्या अंजीर बागेस शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी पाहणी करून लागवडीची पध्दत जाणून घेतली.
 
तज्ञांकडून शेतकऱ्यांना मिळाली ही माहिती

उष्‍ण व कोरडे हवामान अंजिराला चांगले मानवते. विशेषतः कमी पावसाच्‍या भागात जिथे ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत पाण्‍याची थोडीफार सोय आहे, अशा ठिकाणी अंजिर लागवडीस वाव आहे.अंजीर लागवडीसाठी अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटरपर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम होय. मात्र या जमिनीत चुन्‍याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमीन या फळझाडाला अयोग्‍य असते. खोलगट आणि निचरा नसलेल्‍या जमिनीत हे झाड पाहिजे तसे चांगले वाढत नाही, अशी माहिती दौऱ्यावरुन आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितली. तसेच अंजीरापासून तयार केलेले विविध जाम व प्रक्रिया केलेल्या  पदार्थांची माहितीही घेतली.

कोणी काय सांगितले

- डॉ. विजय सुपे सहयोगी संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी अंजीर लागवड व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन केले.
- शेतकरी समीर डोंबे यांनी अंजीर प्रक्रिया व विक्रिव्यवस्थापन बाबत माहिती दिली.
- डॉ. गणेश इधाते, प्रमुख अंजीर संशोधन केंद्र, (जाधववाडी ता. पुरंदर ) यांनी अंजीर बहार व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. 
- डॉ. देविदास काकडे यांनी कीड रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच वैशाली आडसुळ, के.व्ही.के.चे डॉ.रतन जाधव, यशवंत जगदाळे, ओंकर ढोबळे, संतोष गोडसे उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील पूर्वेकडील भाग हा अंजीर पिकासाठी योग्य आहे, या गावातील शेतकरी टँकरने पाणी घालून अंजीर बागा जगवतात अशाच बागा इतर भागातील गावात ही व्हाव्यात, त्यासाठी लागणारी रोपे केव्हिकेमार्फत पुरवली जातील. येथील शेतकरी फळाच्या क्वालिटीनुसार पॅकिंग करून त्याची विक्री करतात व पैसे कमवत आहेत. दोन बहारापैकी कोणता बहार आपल्या भागात येऊ शकतो याचा विचार करून पीक लागवड करावी.
- राजेंद्र पवार - चेअरमन, बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट.

महाराष्ट्रात सर्वाधिक अंजीर पुणे जिल्ह्यात !

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अंजीर लागवड केलेली आहे. अलीकडच्या काळात सोलापूर-उस्मानाबाद, बीड व नगर जिल्ह्यात काही भागातील शेतकरी लागवडीसाठी पुढे आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com