रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आठ दिवसांची मुदत; अन्यथा परिणामाला सामोर जा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या आठ किलोमीटर रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवा, अशी मागणी चांदेकसारे ग्रामपंचायतीने सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग संगमनेर यांच्याकडे केली आहे.

पोहेगाव (अहमदनगर) : झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या आठ किलोमीटर रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवा, अशी मागणी चांदेकसारे ग्रामपंचायतीने सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग संगमनेर यांच्याकडे केली आहे. आठ दिवसात खड्डे बुजवले गेले नाहीत तर परिसरातील ग्रामस्थांनाबरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच पुनम खरात व उपसरपंच विजय होन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा संपलेला असून झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक व्यक्ती या खड्ड्यांमुळे जखमी झालेले आहेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. हे खड्डे 5 नोव्हेंबरपर्यंत बुजवले गेले नाही तर झगडे फाटा चौफुलीवर तीव्र स्वरूपाचा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामध्ये जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, चांदेकसारे, झगडे फाटा येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. 

एवढे करूनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या घरावर तसेच कार्यालयावर ही मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. याबाबत माजी सरपंच केशव होन यांनी सांगितले 15 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता शासनाने तयार करून घेतला होता. अनेक आंदोलने अनेक निदर्शने झाल्यानंतर या रस्त्याचे काम झाले मात्र आज रोजी रस्त्याचे काम होऊन चार वर्ष देखील उलटले नाही तोच त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight days to fill potholes on Jhagde Fata to Puntamba Fata road