नेवाशात साडेबाराशे कर्मचाऱ्यांंवर निवडणूक भार

सुनील गर्जे
Friday, 1 January 2021

तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी 8 झोनल अधिकारी कार्यरत असतील. शिवाय 42 निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहत आहेत.

नेवासे : तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. या गावांतील 227 मतदान केंद्रांचा भार तब्बल 1250 कर्मचारी सांभाळणार आहेत. 

तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी अर्ज छाननीचे काम झाले असून, 4 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे गावोगावी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बंडखोरांच्या माघारीसाठी पॅनेलप्रमुख मनधरणी करताना दिसत आहेत. गावोगाव बैठका, चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत.

दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर मतदानप्रक्रियेसाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने मतदान केंद्रावरील भौतिक सुविधांसह प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करण्यासाठी नियोजन केले आहे. 

दरम्यान, विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना या कामाला जुंपले आहे. त्यांची नियुक्ती, प्रशिक्षण, नियम व निर्देशांची माहिती, याबाबत तालुकास्तरावर यंत्रणा सज्ज केली आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय परदेशी, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. 

तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी 8 झोनल अधिकारी कार्यरत असतील. शिवाय 42 निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहत आहेत. त्यांना 42 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक मदत करीत आहेत. तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींसाठी एकूृण 109 प्रभाग असून, 591 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एक लाख 37 हजार 987 मतदार आहेत. 

तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय पातळीवर संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. 
- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे , अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election burden on one and a half hundred employees in Nevasa