फोडोफोडीचे राजकारण जोरात; ‘येथे’ सभापतिपदासाठी काठावरचा खेळ

संजय आ. काटे
Monday, 10 August 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे. काठावरच्या खेळात फोडाफोडीचे राजकारण जोरात रंगले आहे

श्रीगोंदे (अहमदनगर) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे. काठावरच्या खेळात फोडाफोडीचे राजकारण जोरात रंगले आहे.

एका गटाने 18 पैकी 10 संचालक सोबत असल्याचा दावा केला आहे. मात्र, एक संचालक फुटला, तरी समसमान मते होऊन गोंधळाची स्थिती होऊ शकते. आमदार बबनराव पाचपुते गटाकडून लक्ष्मण नलगे, तर विरोधी गटाकडून संजय जामदार यांची नावे सभापतिपदासाठी चर्चेत आहेत. 

श्रीगोंदे बाजार समितीत वर्षभरासाठी सभापती व उपसभापतींच्या निवडी उद्या (सोमवारी) होत आहेत. यापूर्वीचे सभापती धनसिंग भोईटे व उपसभापती वैभव पाचपुते यांनी वेगवेगळ्या कारणांनी राजीनामा दिल्यानंतर या निवडी होत आहेत. समितीत पाचपुते यांना मानणारे आठ, तर नागवडे व जगताप यांना मानणारे 10 संचालक होते. मात्र, नंतरच्या निवडीत उलटफेर झाला. पाचपुते यांच्या ताब्यात सत्ता आली. गेल्या चार वर्षांत अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आजही दोन्ही बाजूंनी जिंकण्याचा दावा होत असला, तरी काठावरचा खेळ असल्याचे मान्य करावे लागेल. 

सद्यस्थितीत एका गटासोबत 10 संचालक दिसत असले, तरी प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी काय स्थिती राहिल, यावरच निकाल अवलंबून असेल. कारण, या निवडीत पक्षीय बंधने नाहीत. पक्षाचा व्हीप नसल्याने, संचालक मनाचे मालक आहेत. सभापतिपदासाठी नलगे व जामदार यांची नावे चर्चेत आहेत. उपसभापतिपदासाठी मात्र दोन्ही बाजूंनी गुप्तता बाळगली गेली आहे. नलगे यांच्या गटाच्या एका जबाबदार संचालकाने सांगितले, की दावा कुणीही काहीही करीत असले, तरी सध्या समान स्थिती आहे. निवडीत काहीही चमत्कार घडू शकतो. 

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election for the post of Chairman for Shrigonda Agricultural Produce Market Committee on Monday