
दुचाकीत पेट्रोल कमी भरल्याच्या आरोपावरून एकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
संगमनेर (अहमदनगर) : दुचाकीत पेट्रोल कमी भरल्याच्या आरोपावरून एकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना समनापूर (ता. संगमनेर) येथे शुक्रवारी (ता. 4) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संदीप गुंजाळ व अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. समनापूर शिवारातील रुक्मिणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक रवींद्र मुंगसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास संदीप गुंजाळ दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आला.
पेट्रोल भरल्यानंतर ते कमी असल्याच्या आरोपावरून त्याने कर्मचारी शकील शेख याच्याशी हुज्जत घालत त्याला ओढून रस्त्याच्या कडेला नेले. मोठ्या वाहनाच्या आडोशाला संदीप गुंजाळ व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी शेखला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
संपादन : अशोक मुरुमकर